Cotton Rate : गत दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र असे असले तरी इतर पिकांचा पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 च्या खरीप हंगामात कापसाचे वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले होते. गेल्या वर्षी मानसून कालावधीत खूपच कमी पाऊस झाला, अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली.
यामुळे कापसाच्या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांची घट आली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात कमी कालावधीत जास्तीचा पाऊस झाला आणि यामुळे कापसाचा दर्जा घसरला. एकीकडे कापसाच्या उत्पादनात घट आली तर दुसरीकडे गेल्या हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला बाजारात फारसा भावही मिळाला नाही.
सुरुवातीला 7000 पासून ते 9 हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. मात्र बाजारात आवक वाढल्यानंतर बाजार भाव घसरलेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पांढऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आणि याचा परिणाम म्हणून बाजारभाव सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन आदळलेत.
महत्त्वाचे म्हणजे काही भागात कापसाला पाच हजार ते सहा हजार आठशे यादरम्यानच भाव मिळाला. पण, यंदा हे चित्र बदलणार असा आशावाद व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या कापसाला सुद्धा 6800 रुपयांचा भाव मिळाला होता.
मात्र यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला मागणी राहील आणि याचा परिणाम म्हणून कापसाला 7000 ते 7500 असा दर मिळेल असे म्हटले जात आहे. खरे तर अजून नवीन हंगामातील कापूस बाजारात आलेला नाहीये.
खानदेशात काही ठिकाणी ज्यांनी लवकर कापसाची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणीसाठी तयार होत आहे. मात्र अजूनही नवीन कापसाची आवक होत नाहीये. परंतु येत्या काही दिवसांनी नवीन कापूस बाजारात येणार आहे.
दरवर्षी विजयादशमीपासून नवीन माल बाजारात दाखल होत असतो. यंदाही नवरात्र उत्सवानंतर म्हणजेच दसऱ्यानंतर बाजारात नवीन कापूस चमकणार असे आशावादी चित्र तयार होत आहे. तत्पूर्वी मात्र जुन्या कापसाला 7800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे.
याचे कारण म्हणजे सरकीचे दर चार हजार तीनशे रुपये आणि सरकी ढेपचे दर चार हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत. कापसाची गठाण देखील 60000 रुपयांवर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा पाऊसमान चांगला असल्याने कापसाचे पीक चांगले बहरले आहे.
यामुळे उत्पादन वाढणार आणि कापसाला सध्याची परिस्थिती पाहता साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळणार असे दिसत आहे. मात्र सरकीचे बाजार भाव कमी जास्त झाले तर याचा परिणाम कापूस बाजार भाव पाहायला मिळणार आहे.
सध्या सरकीला जो दर मिळतोय त्यामध्ये जर आगामी काळात कपात झाली तर नक्कीच कापसाचे दरही कमी होणार आहेत. म्हणजेच आगामी काळात सरकीच्या बाजारभावात घसरण झाली तर कापसाचे दर साडेसात हजार रुपयांपेक्षा कमी होतील अशी भीतीही व्यक्त होत आहे.