Cotton Rate : नेहमीप्रमाणे यावर्षीही कापसाचा हंगाम विजयादशमीला अर्थातच दसऱ्याला सुरू झाला. मात्र आतापर्यंत विजयादशमीला सुरू झालेल्या या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. आता हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस आधीच विकला आहे. अशातच आता हळूहळू कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा कमाल भाव 8000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे.
सध्या राज्यातील बहुतांश बाजारपेठेत कापसाचा भाव 7000 ते 7800 रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र अकोल्यात बाजारभाव 7900 रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
अशा स्थितीत येत्या काही दिवसांत कापसाचे भाव आणखी वधारणार अन दोन वर्षांपूर्वी जसा विक्रमी भाव मिळाला होता तसा भाव मिळू शकतो अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
पांढऱ्या सोन्याला अर्थातच कापसाला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. राज्यातील बहुतांश बाजारात कापसाचे भाव आता एमएसपीच्यावर गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तथापि, या भाववाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार आहे. अनेकांनी आपल्याकडील माल आधीच विकला असल्याने या भाव वाढीचा फायदा कोणाला होणार ? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारने लॉंग स्टेपलं कापसाची किमान आधारभूत किंमत (MSP) 7020 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे, तर मध्यम स्टेपलं कापसाची MSP प्रति क्विंटल 6620 रुपये निश्चित केली आहे. पण काही दिवसांपासून भाव फारच कमी होत होते.
अनेक ठिकाणी आम्ही भावापेक्षा कमी दर मिळत होता. पण, यंदा उत्पादन कमी झाल्याचे कळताच भाव वाढू लागले आहेत. जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढत असल्याने देशांतर्गत देखील कापसाचे भाव वाढू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कापसाची मागणी देखील वाढली आहे. याशिवाय रुईचे आणि सरकीचे भाव देखील आता वाढत आहेत. हेच कारण आहे की कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाचे भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
जाणकार लोकांनी तर एप्रिल 2024 मध्ये कापसाला 8300 प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजे जाणकार लोकांनी यंदा कापसाला दहा हजाराचा भाव मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.