Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील बहुतांश शेतकरी या पिकाच्या शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मात्र कापूस उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कापसाचे बाजार भाव दबावात असल्याने शेतकऱ्यांना या पिकाची शेती परवडत नाही. या चालू हंगामात देखील आत्तापर्यंत कापसाचे बाजार भाव दबावातच पाहायला मिळाले आहेत. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आणि शेतकऱ्यांकडील बहुतांशी माल विक्री झाल्यानंतर बाजारभाव थोडेसे वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कापसाचे बाजार भाव गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा परिणाम म्हणून कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे. एवढेच नाही तर बाजार अभ्यासाकांनी या बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता यावेळी वर्तवली आहे.
सध्या काय भाव मिळतोय
मीडिया रिपोर्टनुसार सध्या देशांतर्गत कापसाला सरासरी 7350 ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे खेडा खरेदीमध्ये देखील सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
एवढेच नाही तर राज्यातील काही बाजारांमध्ये कमाल बाजार भाव आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र हे बाजार भाव खूपच मोजक्या बाजारात आणि खूपच कमी मालाला मिळाले आहेत.
यामुळे याचा अगदी बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जिनिंगचा कापूस खरेदीचा भाव हा 7600 ते 8200 दरम्यान नमूद करण्यात आला आहे. अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या महिन्यात रुईला उठा होता मात्र सरकीला उठाव मिळत नव्हता.
आता मात्र सरकीला सुद्धा उठाव मिळाला आहे. सरकीचे भाव गेल्या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात 2200 ते 2500 रुपये एवढे होते आता मात्र हेच भाव 2600 रुपये ते 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कापसाचे भाव देखील सुधारत आहेत.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे भाव तेजीत आहेत. दुसरीकडे भारतातील कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा 12 टक्क्यांनी कमी आहेत. यामुळे साहजिकच भारताच्या स्वस्त कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे.
तसेच देशांतर्गत कापसाची मागणी वाढत असून पुरवठा कमी होत आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर आगामी काळात कापसाचे सरासरी भाव 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
एवढेच नाही तर मे महिन्यात या बाजारभावात आणखी पाच टक्क्यांची वाढ होईल असे देखील तज्ञ नमूद करत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असेल त्यांना आगामी काळात चांगला दर मिळू शकणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने आपल्या कापसाची विक्री करावी.