Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. लागवडीबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात कापूस लागवडीचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. परंतु उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा पहिला क्रमांक लागतो.
म्हणजेच आपल्या राज्यापेक्षा जास्तीचे उत्पादन गुजरात मध्ये घेतले जाते. राज्यात कापसाची शेती विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागात सर्वात जास्त होते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात कापूस लागवड पाहायला मिळते.
अर्थातच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून मात्र हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगलेच चिंतेचा विषय ठरत आहे. कारण की बाजारात कापसाला मनासारखा भाव मिळत नाहीये.
या चालू हंगामात अर्थातच गेल्या वर्षी विजयादशमीपासून सुरू झालेल्या हंगामातही कापूस बाजार भाव पूर्णपणे दबावात पाहायला मिळाले आहेत.
अशातच मात्र कापूस उत्पादकांसाठी काल बाजारातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर भारतातील बहुतांशी कापूस उत्पादक राज्यांमध्ये बाजार भाव थोडेसे वाढले आहेत.
बाजारभावात शंभर ते दोनशे रुपयांची किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे बाजार अभ्यासकांनी आगामी काळातही बाजार भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
काल महाराष्ट्रात 47 लाख आणि गुजरात मध्ये 40 लाख कापूस गाठींची आवक झाली. तसेच देशातील उर्वरित राज्यांमध्ये प्रत्येकी 50 हजार कापूस गाठींची आवक पाहायला मिळाली. काल आवक थोडीशी कमी झालेली होती.
त्यामुळे बाजारभावात थोडी सुधारणा झाली. देशातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला किमान साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच सरासरी भाव 6 हजार 700 ते 7 हजार 100 या दरम्यान नमूद करण्यात आले आहेत.
दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा येथील देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला आहे.
दरम्यान बाजारातील अभ्यासक लोकांनी सध्या देशांतर्गत कापसाचे भाव वाढले असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील भाव वाढले असल्याने येत्या दोन आठवड्यात कापसाला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळू शकतो अशी आशा व्यक्त केली आहे.