Cotton Rate : कापूस एक नगदी पिक आहे. या पिकाची संपूर्ण महाराष्ट्रात लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अलीकडे मात्र या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
खरंतर गेल्या दोन वर्षांपासून कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. या चालू हंगामातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
विशेष बाब अशी की वायदे बाजारात दरात सुधारणा होत असतानाही बाजार समित्यांमधील बाजार भाव दबावात पाहायला मिळत आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली त्यानंतर मग देशातील वायद्यांमध्येही कापूस बाजार भाव सुधारलेत.
मात्र प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये अजूनही बाजारभाव दबावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काल वायदे बाजारात खंडीमागे पाचशे रुपयांची सुधारणा झाली.
दुसरीकडे बाजार समितीमध्ये अजूनही भाव दबावातच आहे. यामुळे बाजार समितीमध्ये कापसाचे भाव केव्हा वाढणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या तीन महिन्यानंतर वायदे बाजारात कापसाचे भाव 85.45 सेंट प्रति पाउंड वर पोहचले आहेत. खंडीमध्ये हा भाव ५६ हजार रुपयांच्या दरम्यान होतो.
जागतिक पातळीवर कापूस बाजारात मागणी तसेच गुंतवणूक वाढत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून वायदे बाजारात दरात मोठी सुधारणा झाली आहे.
मार्चचे वायदे 58 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच जानेवारीचे वायदे हे 56 हजार 200 रुपयांवर गेले आहेत. बाजार समितीमध्ये मात्र काल बाजारभाव ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी निराश आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाचे आवक वाढलेली आहे यामुळे बाजारभाव दबावत आहे.
मात्र पुढल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीमध्ये कापसाची आवक कमी होईल आणि बाजारभावात सुधारणा दिसेल असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे.