Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. खरीप हंगामामध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागात कापसाची लागवड केली जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे.
मात्र हे नगदी पिक अलीकडे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरू लागले आहे. कापसाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने आणि उत्पादनात घट आली असल्याने याची शेती शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
एकतर, गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाच्या दरात झालेली वाढ, वाढती महागाई, कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, वाढलेली मजुरी या साऱ्या पार्श्वभूमीवर कापूस पिक उत्पादित करण्यासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागतोय.
मात्र अधिकचा उत्पादन खर्च करूनही नैसर्गिक संकटांमुळे कापसाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळत नाहीये. या हंगामात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. गुलाबी बोंड अळी, मान्सूनोत्तर झालेला अवकाळी पाऊस यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
याचा परिणाम म्हणून देशांतर्गत चांगल्या दर्जाच्या कापसाची कमतरता भासत आहे. मात्र असे असले तरी सध्या स्थितीला देशांतर्गत कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.
कापसाचा हमीभाव ७०२० रुपये असतानाही सध्या खुल्या बाजारात कापसाला ६००० ते ६८०० असा दर मिळत आहे. ओलावा अधिक असल्याचे कारण देत कापसाचे दर दबावात ठेवले जात आहेत.
आता मात्र कापसाच्या कमी उत्पादनामुळे आणि दर्जेदार कापसाची उपलब्धता होत नसल्याने बाजारभावात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसाच्या गाठीबरोबरच सरकीचे दरही सुधारण्याची शक्यता असल्याने कापसाच्या भावातही सुधारणा होण्याचा अंदाज आहे.
कापसाचे भाव लवकरच ७००० रुपयांच्या पुढे जातील, असे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. काही तज्ञांनी तर कापसाला ७५०० रुपये क्विंटलचा भाव मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यामध्ये बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे आता बाजारभावात सुधारणा होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.