Cotton Rate Maharashtra : कापसाचा हंगाम आता जवळपास संपला आहे. काही भागात बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी देखील बंद झाली आहे. तर काही ठिकाणी येत्या काही दिवसात खरेदी बंद होणार आहे. काही बाजारात कापसाच्या खरेदीसाठी वाढ देण्यात आली आहे.
एकंदरीत कापसाचा हंगाम येत्या चार ते पाच दिवसात आता संपणार असे चित्र आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीसाठी 19 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याचाच अर्थ येत्या शनिवार पर्यंत या बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी सुरू राहणार आहे. त्यानंतर या बाजारातील कापसाची खरेदी बंद होणार आहे.
अशातच मात्र कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कापूस हंगाम ऐन संपत असतानाच कापसाच्या बाजारभावात वाढ होत असल्याने शेवट गोड तर सारं गोड अशी परिस्थिती होणार असं सांगितले जात आहे. सेलू एपीएमसी मध्ये कापूस खरेदी अंतिम टप्प्यात असतानाच कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाजारात 12 ऑगस्ट रोजी कापसाला प्रतिक्विंटल किमान ७४३५ ते कमाल ७८३५ रुपये, तर सरासरी ७८२५ रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच शुक्रवारी म्हणजे 10 ऑगस्टला कापसाला प्रतिक्विंटल किमान ७७२५ ते कमाल ७८०० रुपये, तर सरासरी ७७८० रुपये एवढा भाव मिळाला होता.
तसेच गुरुवारी म्हणजे 9 ऑगस्टला कापसाची १२१२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७६४० ते कमाल ७७६५ रुपये, तर सरासरी ७७२५ रुपये भाव मिळाला आहे. एकंदरीत आता कापसाचे बाजार भाव 8000 रुपयांकडे वाटचाल करत आहेत.
तर कापसाचा हंगाम सुरू झाला तेव्हा सेलू एपीएमसी मध्ये कापूस साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता. मुहूर्तावर कापसाला विक्रमी भाव मिळाला यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामभर कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र कापसाचे भाव मध्यंतरी खूपच कमी झालेत. सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात कापसाची विक्री करावी लागली.
गेल्या काही दिवसांपूर्वी काही बाजारात कापसाला अवघा 6,000 ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमी दर मिळाला होता. मात्र आता अंतिम टप्प्यात दरात वाढ होत असून कापसाची वाटचाल आठ हजार रुपये प्रति क्विंटल कडे सुरु झाली आहे. याचा फायदा मात्र खूपच कमी शेतकऱ्यांना होणार आहे.