Cotton Rate Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक अर्थातच कॅश क्रॉप आहे. या पिकाची संपूर्ण भारतात लागवड केली जाते. खरीप सीजनमध्ये हे पीक उत्पादित केले जाते. वास्तविक कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर येते.
पण उत्पादनाच्या बाबतीत गुजरात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या राज्यात कापसाची उत्पादकता ही कमी होत चालली आहे. यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत ठरले आहेत.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, कापसाचे फरदड उत्पादन घेणे, एकाच जमिनीत सातत्याने कापसाचे पीक घेणे इत्यादी कारणांमुळे कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे.
एकीकडे कापसाचे उत्पादन कमी होत आहे तर दुसरीकडे बाजारात मालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या दोन वर्षात मोठे नुकसान झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळाला होता.त्यावेळी शेतकऱ्यांना या पिकातून चांगला पैसा मिळाला होता. पण गेल्या हंगामापासून कापूस दर दबावात आहेत.
शिवाय शेतमजुरीचे दर दिवशी दिवस वाढत आहेत. यामुळे शेतकरी संकटात आले आहेत.अशातच मात्र आता उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
आतापर्यंत हमीभावाच्या आसपास असलेले कापूस दर आता दिवाळीनंतर थोडेसे तेजीत आले आहेत.दरम्यान, कापसाचे आगार म्हणून ख्यातनाम असलेल्या मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यातही कापूस दर तेजीत आले आहेत.
परभणीत मुहूर्ताच्या कापसाला चांगला दर मिळाला आहे. परभणी एपीएमसीच्या टीएमसी मार्केट यार्डावर काल मंगळवारी खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी मार्केट यार्डात वीस वाहनांमधून कापसाची आवक झाली होती. या लिलावात कापसाला सात हजार 511 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव देण्यात आला आहे.
परिणामी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. महूर्तलाच समाधानकारक भाव मिळाला असल्याने आगामी काळात आणखी भाव वाढ होईल अशी भोळी भाबडी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे.