Cotton Rate : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे तीन विभाग कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. येथे कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
यावरून आपल्याला राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसावर अवलंबून असल्याचे समजते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाच्या पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी कापसाला हमीभावापेक्षा थोडासा अधिक भाव मिळाला होता. यंदा मात्र राज्यातील अनेक बाजारांमध्ये बरेच दिवस कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला गेला आहे.
साहजिकच याचा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकांना तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाही.
पिक उत्पादनाचा खर्च आणि वाहतुकीचा खर्च काढतानाच शेतकऱ्यांना नाकी नऊ आली आहेत. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच पांढरे सोने कडाडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कापसाचे भाव थोडे-थोडे वाढत आहेत. यंदा कापसाचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज समोर आल्यानंतर ही भाव वाढ होत असल्याचे बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात आणखी दरात सुधारणा होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. सध्या स्थितीला राज्यातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे भाव हमीभावाच्या पुढे गेले आहेत.
मध्यंतरी कापसाचे भाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले होते. आता मात्र बाजार भाव 7500 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात देखील दरातील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. ए
प्रिल महिन्यापर्यंत कापसाचे भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात असा एक अंदाज आहे.
तथापि बाजारातील परिस्थिती पाहूनच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या विक्रीचे नियोजन करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.