Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. कापसाची लागवड मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश मध्ये अर्थातच धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यात कापूस लागवड सर्वाधिक उल्लेखनीय आहे.
मात्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर येथेही थोड्याफार प्रमाणात कापसाची लागवड पाहायला मिळते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे लागवड कमी आहे.
दरम्यान पांढर सोन म्हणून ओळखल जाणार हे पिक आता शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागले आहे. गेल्या वर्षी कापसाला खूपच कमी भाव मिळाला आणि यावर्षी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी काही ठिकाणी हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला होता, यंदा मात्र काही ठिकाणी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी विशेष खास राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शेवगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळ अर्थातच सीसीआय यांच्या माध्यमातून एफएक्यू कापसाची किमान हमीभावात खरेदी सुरु झाली आहे.
यामुळे शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादकांना येथे कापूस विक्री करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याच्या विक्रीत किमान हमीभाव तरी मिळणार अशी भोळी-भाबडी आशा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खरंतर या हंगामात नैसर्गिक संकटांमुळे, पावसाच्या लहरीपणामुळे, विविध प्रकाराची रोगराई आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. यामुळे कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांची होती.
सध्या मात्र कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. हेच कारण आहे की आता शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर शेवगाव येथे CCI ची कापूस खरेदी सुरू झाली आहे.
याशिवाय मिरजगाव येथे देखील सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार आहे. त्या ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी कापसाची विक्री नजीकच्या सीसीआय केंद्रावर करावी असे आवाहन सी सी आय चे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.