Cotton Rate : विजयादशमी नंतर कापसाची आवक वाढते. यंदा मात्र विजयादशमी उलटून आता बरेच दिवसं झालेत पण तरीही कापसाची आवक पाहिजे तशी वाढलेली नाही. आज पासून दिवाळीला सुरुवात झाली आहे, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अजून म्हणावी तशी कापूस आवक होत नाहीये.
कापसाबाबत बोलायचं झालं तर कापूस हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड होते.
विदर्भाला कापसाची पंढरी म्हणून ओळखले जाते. दरम्यान याच पंढरीतून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील स्थानिक एम. आर. जिनिंग प्रेसिग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी काटा पूजन करून मुहूर्ताच्या कापसाला 7161 रुपये प्रति क्विंटल असा भाव देण्यात आला. अर्थातच हा भाव अजूनही एम एस पी च्या खालीच आहे. खरे तर कापसाला गेल्यावर्षी 7 हजार 20 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला होता.
यंदा मात्र यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यंदा कापसाला 7521 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पण अजून राज्यात कुठेच कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
राज्यातील प्रमुख सध्या कापसाला काय दर मिळतोय
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 7000 कमाल 7151 आणि सरासरी 7075 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय.
एकंदरीत सध्या कापसाचे भाव दबावात असून अजून कापसाने हमीभावाचा टप्पा गाठलेला नाही. यामुळे बाजारात कापसाची आवक देखील फारच मर्यादित आहे. जेव्हा कापसाचे दर वाढतील तेव्हाच माल बाजारात आणायचा असे धोरण सध्या तरी शेतकऱ्यांनी आखलेले दिसते. यामुळे आता भविष्यात कापसाचे दर कसे राहणार यावरच कापूस उत्पादकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.