Cotton Rate : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता राज्यातील अनेक प्रमुख बाजारांमध्ये कापसाचे भाव वाढू लागले आहेत. खरे तर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्यातील कापूस उत्पादकांना कपाशीचे पीक परवडत नसल्याचे चित्र आहे.
याचे कारण म्हणजे हवामान बदलांमुळे आता कपाशी पिकासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत नाही. पिकावर विविध रोगांचे आणि कीटकांचे सावट पाहायला मिळत असल्याने पिक उत्पादनात देखील घट येत आहे.
शिवाय बाजारात कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाला समाधानकारक भाव मिळत आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापसाला आठ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. बाजारातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, आता आवक कमी झाली आहे.
काल १३ मार्च रोजी अकोलाच्या बाजारात फक्त ८८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. अकोल्याच्या बाजारात कालच्या लिलावात कापसाला किमान 7600 रुपये, कमाल 7989 रुपये आणि सरासरी 7794 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे.
म्हणजेच सध्याचा कापसाचा भाव हा किमान आधारभूत किंमत (MSP) पेक्षा जास्त आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाला केंद्र सरकारने ठरवलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता.परंतु आता हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
दुसरीकडे परभणीत त्याचा भाव 8000 रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या म्हणण्यानुसार, १३ मार्च रोजी परभणीच्या बाजारात मध्यम कापसाचा कमाल भाव ८३०० रुपये प्रति क्विंटल होता. तर सरासरी भाव 8040 रुपये होता.
मात्र फारसे उत्पादन शिल्लक नसल्याने त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने भाव चढे राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात सरासरी 8000 चा भाव मिळू शकतो असा दावा काही तज्ञांनी केला आहे.
दुसरीकडे एप्रिल आणि में महिन्यात कापसाला 8300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासर दर मिळण्याची शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या वाढत असलेल्या बाजारभावाचा त्यांना फारसा फायदा होत नसल्याचा युक्तिवाद केला आहे.
शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आता त्यांच्याकडे खूपच कमी कापूस शिल्लक आहे. यामुळे या वाढलेल्या भावाचा त्यांना फायदा होणार नाहीये. तथापि ज्यांच्याकडे कापूस शिल्लक असेल त्यांना या वाढीव बाजारभावाचा फायदा मिळू शकणार आहे.