Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सुखद बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत आहे. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर खानदेश मध्ये मिळाला होता. मात्र मुहूर्ताच्या कापसाला तो दर मिळाला होता. औरंगाबाद जिल्ह्यातही मुहूर्ताच्या कापसाला 11,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला.
त्यानंतर मात्र कापसाच्या दरात घसरण झाली. कापूस बाजार भाव चक्क सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव संकटात सापडला. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने त्यांना कापूस विकावा लागला. मात्र दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली.
यामुळे कापूस दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे. यामुळे जाणकार लोकांनी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळणार असल्याचे जे भाकीत वर्तवलं होतं ते तंतोतंत खरा ठरल आहे.
महाराष्ट्रातील हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (21 नोव्हेंबर) कापसाला तब्बल 9250 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर आणि 8,900 चा सरासरी दर मिळाला आहे. तसेच आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9051 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला तर 9025 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला.
19 नोव्हेंबर रोजी तर आर्वी एपीएमसीमध्ये कापसाला तब्बल साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला, तसेच सरासरी बाजार भाव 9400 रुपये नमूद करण्यात आला होता. निश्चितच 19 तारखेच्या तुलनेत काल कापूस दरात जवळपास 500 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र असे असले तरी तूर्तास कापूस दर तेजीत आहेत.
विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीची आशा असल्याने बाजारात सध्या कापसाची आवक कमी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना या हंगामात कापूस दर 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाईल अशी आशा आहे. जाणकार लोक कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळणार असल्याचे स्पष्ट करत आहेत.