Cotton Rate : कापूस हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या पिकावर अवलंबून आहे. यामुळे जर कापसाला योग्य भाव मिळाला तरच येथील शेतकऱ्यांना शेती परवडते अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागते.
गेल्या वर्षी कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तसेच जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर यंदा देखील पिकासाठी आलेला खर्च भरून निघणार नाही अशी तक्रार शेतकरी बांधवांच्या माध्यमातून केली जात आहे.
अशातच मात्र हिंगोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिंगोली शहरात जवळील लिंबाळा मक्ता भागात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. काल 12 फेब्रुवारी 2024 पासून हे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
यामुळे परिसरातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खरेदीचा पहिला दिवस होता.
दरम्यान, कालच्या या पहिल्याच दिवशी या केंद्रावर 357 क्विंटल 40 किलो कापसाची आवक झाली. या कापसाला 6 हजार 920 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. मात्र सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर एकरी बारा क्विंटलची मर्यादा आहे.
अर्थात जर एखाद्या शेतकऱ्याने सातबारा उताऱ्यावर एका एकरावर कापसाची लागवड केली असल्याचे नमूद केलेले असेल तर अशा शेतकऱ्याला फक्त बारा क्विंटल कापसाची विक्री करता येणार आहे.
जर सदर शेतकऱ्याकडे बारा क्विंटल पेक्षा अधिकचा कापूस असेल तर अशावेळी त्या शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
यामुळे कापूस खरेदीसाठीचीची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित करण्यात आली आहे.