मंडळी, कापूस ज्याला शेतकरी पांढर सोनं म्हणतात, ते पांढरं सोन शेतकऱ्यांसाठी अगदीच कवडीमोल ठरलंयं. महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. म्हणूनच कांदा, सोयाबीन पाठोपाठ आता कापसाचा भाव हा देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्वलंत मुद्दा बनलाय. कापूस उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च करावा लागतो, पण बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही. यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.
विजयादशमीपासून सुरू झालेला कापसाचा नवा हंगाम अगदी सुरुवातीपासूनच दबावात असून डिसेंबर 2024 अखेरपर्यंत कापसाचा बाजार दबावात होता. यामुळे आता नव्या वर्षात कापसाच्या बाजाराची स्थिती कशी राहणार हा प्रमुख सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय. म्हणूनचं आज आपण कापसाचे बाजार भाव का पडलेत ? 2025 मध्ये कापसाच्या बाजार भावात सुधारणा होऊ शकते का ? याबाबतचा आढावा घेणार आहोत.
मित्रांनो, केंद्र सरकारनं 2024-25 च्या खरीप हंगामासाठी कापसाला प्रती क्विंटल 7, 521 रुपये हमीभाव जाहीर केलाय. पण प्रत्यक्षात कापसाला हमीभावा एवढा सुद्धा दर मिळत नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये कापसाला 6, 900 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान भाव मिळाला होता. म्हणजेच नोव्हेंबरमध्ये हमीभावापेक्षा पाचशे रुपये इतका कमी दर मिळाला. गेल्या डिसेंबर महिन्यात यात दोनशे-तीनशे रुपयांची वाढ झाली, पण या बाजारभावात पिकासाठी आलेला खर्च वसूल होणार नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आता आपण कापसाचे भाव का पडलेत ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
कापसाचे भाव पडण्याचे प्रमुख कारण
मंडळी सोयाबीन अन कापूस या दोन्ही नगदी पिकांचा भाव हा आंतरराष्ट्रीय घडामोडींशी जोडलेला असतो. जागतिक बाजारपेठेचा कापूस आणि सोयाबीन पिकाच्या बाजारभावावर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार जागतिक मागणीही कमी-जास्त होत असते. कृषी तज्ञ सांगतात की, एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या जवळपास 24% कापसाचं उत्पादन आपल्या भारतात होत. कापसाचे भाव पडण्यामागचं कारण काय आहे ? या प्रश्नाचं उत्तर देताना कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, कापूस हा असा उद्योग आहे ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घेणारे जे देश आहेत यात अमेरिका, चायना, मिडल ईस्टमधील उझबेकिस्तान, पाकिस्तान यांचा जो काही एक दर ठरतो त्याप्रमाणे आपल्याकडील बाजारभावाची तुलना होते.
आंतरराष्ट्रीय बाजारभाव आजघडीला 7 हजाराच्या आसपास असतील अन हे एक कारण आहे की त्यामुळे आज आपल्या कापसाला भाव मिळत नाहीये. तसेच काही तज्ञ सांगतात की, आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी आहेत, त्यामुळे कापसाची आयात वाढली असून भारतात 30 लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची आयात झाली आहे. याशिवाय, कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा सुद्धा स्वस्त झाला आहे, या कारणांमुळे कापसाचे भाव पडले आहेत. मंडळी, आता आपण 2025 मध्ये कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळणार ? याबाबत तज्ञ काय म्हणतात याविषयी जाणून घेणार आहोत.
2025 मध्ये कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळणार ?
कापूस बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, 2024-25 या हंगामात भारतात 112 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात तब्बल 10 लाख हेक्टरनं घट झालीय. लागवडीचे क्षेत्र कमी असल्याने उत्पादन सुद्धा कमीच होणार आहे. कापूस उत्पादन यंदा 7 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. हा अंदाज स्वतः कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीएआय या संस्थेकडून जारी करण्यात आला आहे. पण उत्पादनात सात टक्क्यांनी घट झालेली असतानाही बाजारात कापसाला चांगला दर मिळत नाही.
यासंदर्भात बोलताना अभ्यासक सांगतात की, पुढच्या काही महिन्यांमध्ये कापसाचे बाजारभाव 7,500 ते 7,800 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीचा कापूस तयार होतो. त्याप्रमाणे रेट वाढण्याची शक्यता आहे. काही तज्ञ कापसाला या हंगामात 7,500 रुपयांच्या आसपास भाव मिळू शकतो. कापसाचे भाव 7,200 ते 7,800 रुपयांदरम्यान राहू शकतात, असा अंदाज देत आहेत. एकंदरीत यंदा कापसाचे दर आठ हजार रुपयांच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना योग्य टाइमिंग साधने आवश्यक आहे. म्हणून आता आपण शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कधी करावी याबाबत माहिती पाहुयात.
शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कधी करावी?
राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बरेच शेतकरी कापसाचे भाव वाढतील या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील बहुतांशी शेतकरी दरवाढ होईल अशी आशा बाळगून आहेत. यामुळे मग त्यांनी कापूस साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. पण, शेतकऱ्यांनी कापसाची विक्री नेमकी कधी करावी यासंदर्भात बोलताना बाजार अभ्यासक म्हणतात की, शेतकऱ्यांनी थोडासा धीर धरला तर त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. आज भाव कमी झालाय, त्यात विक्रीची घाई करू नये. कारण आपण आयात थोडीशी थांबवली तर भाव वाढणार आहेत. सरकारवर दबावही आहे की लगेच कापूस आयात करू नका. जरी स्वस्त असेल तरी आयात करू नका, नाहीतर मग आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला समाधानकारक दर मिळाला तर कापूस विक्री करावी नाहीतर थोडे दिवस दरवाढीची वाट पहावी. तज्ञ म्हणतात की शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करायला हवी. म्हणजे एकाच वेळी सर्व कापूस शेतकऱ्यांनी विकणे टाळले पाहिजे. यामुळे जर भविष्यात कापसाच्या दरात वाढ झाली तर त्यांना फायदाच होणार आहे आणि जर समजा दर पडलेत तर त्यांना फारसा तोटा सुद्धा सहन करावा लागणार नाही. अशा पद्धतीने विक्री केल्यास दुसरा एक फायदा म्हणजे बाजारांमध्ये कापसाची आवक वाढत नाही आणि यामुळे दर दबावात येत नाहीत.