Cotton Rate : महाराष्ट्र हे कापूस उत्पादनाच्या बाबतीत खूपच आघाडीवर आहे. आपल्या राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक असून उत्पादनाच्या बाबतीतही आपलाच नंबर लागतो. अर्थातच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसावर अवलंबून आहे.
परंतु गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पांढर सोनं म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे भाव दबावत आहेत.
गेल्या हंगामातही शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने कपाशी पिकातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. यंदा देखील सुरुवातीच्या टप्प्यात तशीच परिस्थिती राहिली होती.
यंदा जवळपास निम्म्याहून अधिक हंगाम उलटला तरीदेखील कापसाच्या बाजारभावात समाधानकारक अशी वाढ झाली नव्हती. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात इंट्री घेणार तोवर कापसाचे भाव अचानक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन ते तीन आठवड्यात कापसाच्या बाजार भावात तब्बल 1000 रुपयांची विक्रमी तेजी आली आहे. यामुळे मात्र उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
तथापि या भाववाढीचा फायदा नेमका किती शेतकऱ्यांना होणार हा एक गहन विश्लेषणाचा भाग राहणार आहे. पण बाजारभावात शेवटी-शेवटी का होईना वाढ झाली असल्याने पिकासाठी आलेला खर्च काढून दोन पैसे संसाराला देखील राहतील असे शेतकरी बोलतांना दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात पांढरे सोन्याचे भाव वाढलेत आणि याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत देखील बाजारभावात सुधारणा होत आहे. तसेच देशात रुईचे आणि सरकीचे भाव देखील गेल्या काही दिवसांत हळूहळू वधारत आहेत. शिवाय, देशांतर्गत मागणी देखील हळूहळू वाढत आहे.
याचाच एकत्रित परिणाम म्हणून सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे अशा सरासरी भावपातळीवर घसरलेले दर गेल्या दोन ते तीन आठवड्यात एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. फेब्रुवारी अखेरीस 7400 ते 7700 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव पांढऱ्या सोन्याला मिळाला आहे.
यामुळे आता एप्रिल महिन्यात बाजार भाव आठ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतात असा अंदाज काही अभ्यासकांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करत राहणे त्यांच्यासाठी सोयीचे ठरणार आहे.
एकाच वेळी कापूस विक्री करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कापसाचा माल विकला तर शेतकऱ्यांना जास्तीचा तोटाही सहन करावा लागणार नाही आणि त्यांना समाधानकारक बाजारभाव मिळू शकणार आहे.