Cotton Rate 2023 : कापूस हे एक प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाची शेती संपूर्ण देशात कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, देशातील कापूस लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला असता आपल्या महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. म्हणजेच कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.
परंतु जेव्हा उत्पादनाचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कापूस उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर येते. म्हणजेच गुजरातमध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र कमी असतानाही उत्पादन अधिक असल्याचे पाहायला मिळते. याचाच अर्थ आपल्या महाराष्ट्रात कापसाची एकरी उत्पादकता खूपच कमी आहे.
हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांपासून कापूस हे कॅश क्रॉप आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी डोईजड करू लागले आहे. शिवाय गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाही.
दरम्यान, यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. पण, शेतकऱ्यांची ही इच्छा यंदा पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळावा अशी इच्छा आहे. मात्र बाजारातील परिस्थिती पाहता बाजार अभ्यासकांनी यंदा कापूस दहा हजाराचा टप्पा पार करणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हे पीक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा अडचणीत आणणार आहे. खरंतर सध्या नवीन हंगामातील कापसाची बाजारात हळूहळू आवक होऊ लागली आहे. काही ठिकाणी खेडा खरेदीच्या माध्यमातून नवीन कापसाची विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात पैशांची निकड असल्याने कापसाची वेचणी होताच क्षणी विक्री केली जात आहे. दरम्यान हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे भाव दबावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून यंदाच्या हंगामातील लॉंग स्टेपल कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव देण्यात आला आहे. मध्यम धाग्यासाठी ६६२० रुपये दर आहे. मात्र सध्या स्थितीला खेडा खरेदीमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. तर काही ठिकाणी हमीभावापेक्षा किंचित अधिक भाव मिळत आहे.
तसेच बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, कापसाचा शिल्लक साठा, बाजारातील मागणी, सरकीच्या दरातील चढउतार हे घटक बाजारावर परिणाम करत असतात. यंदा या तिन्ही घटकांचा विचार केला असता कापसाला सरासरी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळेल. यामुळे शेतकरी बांधवांची कापसाला 10 हजार रुपये भाव मिळण्याची इच्छा धुळीस मिळेल असे सांगितले जात आहे.
सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मात्र यामध्ये भविष्यात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते आणि सरासरी साडेसात हजार रुपयांपर्यंतचा भाव कापसाला मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितले की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे दर सरकारने दबावात ठेवले आहेत. याचा परिणाम हा कापसाच्या दरावर झाला आहे. शिवाय जागतिक पातळीवर कापसाची मागणी कमी झाली आहे. देशांतर्गतही कमी पावसामुळे तसेच अन्य काही घटकामुळे मागणी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाढती महागाई देखील मागणी कमी करत आहे. हेच कारण आहे की यंदा कापसाचे बाजार भाव दबावत राहण्याची शक्यता असते. म्हणजेच कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर यंदाही मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.