Cotton Procurement 2023 : कापूस हे एक नगदी पीक असून या पिकाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. पिकाची लागवड राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यात केली जाते. खानदेशातील जळगाव या जिल्ह्याला कापसाची पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कॉटन हब म्हणून हा जिल्हा ओळखला जात आहे.
या जिल्ह्यात कपाशीची पूर्व हंगामी लागवड देखील विशेष उल्लेखनीय आहे. या चालू खरीप हंगामातील पूर्व हंगामी कपाशी लागवडीचे उत्पादन आता बाजारात देखील येऊ लागले आहे. कापसाच्या नवीन हंगामातील कापूस खरेदीचा या निमित्ताने शुभारंभ देखील झाला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कॉटन हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे नवीन हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मुहूर्ताच्या कापसाला 7 हजार 53 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. तसेच जुन्या कापसाला सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव येथील महावीर कॉटनमध्ये मुहूर्ताच्या नवीन कापसाला सात हजार 111 रुपये आणि कृष्णा कॉटन येथे 7 हजार 31 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त पाहून श्रीजीं जिनिंग मध्ये देखील कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. पण कापसाची आवक खूपच मर्यादित आहे.
राज्यात कापसाची खरी आवक वाढेल ती विजयादशमी अर्थातच दसऱ्यानंतर. विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. आणि तेव्हाच कापसाची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीला उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा आणि राजस्थान यांसारख्या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.