Cotton Price Will Hike : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी आनंदाची बातमी समोर येत आहे. जाणकार लोकांनी कापसाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. खरं पाहता गत हंगामात कापसाला कधी नव्हे तो 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता.
या हंगामात मुहूर्ताचा कालावधी वगळता मात्र तशी परिस्थिती पाहायला मिळाली नाही. चालू हंगामात खानदेश मुहूर्तावर 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता, मात्र तदनंतर कापूस दरात घसरण झाली. मध्यंतरी 9 हजार रुपये प्रति क्विंटल वर दर स्थिरावले.
पण ही परिस्थिती देखील डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बदलली. कापसाला डिसेंबर मध्ये मात्र साडेसात हजाराचा दर मिळाला. चालू महिन्याच्या सुरवातीला मात्र दरात थोडीशी वाढ झाली काही ठिकाणी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर कापसाला मिळू लागला तर कमाल बाजारभावाने 9000चा टप्पा पार केला.
परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी कापूस दरात पुन्हा घसरण झाली. काल झालेल्या लिलावात मात्र कापूस दरात थोडीशी तेजी आली आहे. काल 8,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर देशांतर्गत नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव 8200 ते 8600 दरम्यान नमूद करण्यात आले आहेत.
यामुळे सहाजिकच कापूस उत्पादकांना दिलासा मिळत आहे. मात्र सध्या स्थितीत मिळत असलेला दरात कापूस विक्री परवडणारी नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची आशा आहे.
दरम्यान आता जाणकार लोकांनी कापूस दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र शेतकऱ्यांना दरवाढीसाठी थोडा काळ वाट पहावी लागणार आहे. जाणकार लोकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात तेजी आली असल्याने दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. तसेच चालू हंगामात कापसाचा पेरा वाढला असला तरी देखील देशातील कापूस उत्पादन घटलं आहे.
विशेष म्हणजे गेल्या हंगामात कापसाला अधिक दर मिळत होता यामुळे शिल्लक साठाही खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत मागणीनुसार पुरवठा कुठं ना कुठे खंडित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी व्यापारी बनली आहेत त्यांनी देखील भाव कमी मिळत आहे म्हणून कापूस रोखून धरला आहे. तसेच जागतिक बाजारात कापूस दरात तेजी आली असून कापसाला आणखी मागणी वाढण्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने चीनकडून कापसाला मोठी मागणी येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. या एकंदरीत परिस्थितीचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतील. आणि साहजिकच जागतिक बाजारात दर वाढ झाली म्हणजे याचा आधार देशातील बाजारालाही मिळेल आणि कापूस दर देशांतर्गत वाढतील.
आता किती दर वाढतील याबाबत जाणकार सांगतात की कापसाला यंदा साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 8,500 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दरात कापसाची विक्री शेतकऱ्यांनी करू नये असा जाणकारांकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे.