Cotton Price : कपाशी हे राज्यातील खानदेश, मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.
तीन वर्षांपूर्वी कापसाला बारा ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला होता. खरे तर दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस नवीन कापूस बाजारात येत असतो. जे शेतकरी कापसाची आगात लागवड करतात म्हणजेच लवकर लागवड करतात त्यांचा कापूस सप्टेंबरच्या अखेरीस बाजारात येतो.
दुसरीकडे वेळेवर कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबर महिन्यात बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. विजयादशमीपासून अर्थातच दसऱ्यापासून कापसाची आवक वाढत असते.
यंदाही विजयादशमीपासून बाजारात नवीन कापसाची आवक वाढेल असा अंदाज आहे. अशातच, कापूस उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.
खरंतर येत्या काही दिवसांनी नवीन कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. अशातच सरकीच्या बाजारभावात वाढ झाली आहे. यावर्षीचा कापूस पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर मध्ये प्रत्यक्षात बाजारात येणार आहे. यामुळे यंदाच्या हंगामात कापसाला काय दर मिळणार? याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
कापसाचे भाव वाढणार का ?
खरे तर अलीकडेच सरकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे. यामुळे आगामी काळात कापसाचे दर वाढू शकतात असा एक अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या सरकीचे दर ४ हजार ३००, तर सरकी ढेप चार हजारांच्या वर गेली आहे. कापसाची गठाणही ६० हजारांवर पोहोचली आहे. यामुळे खुल्या बाजारात साधारणतः ७ हजार ५०० रुपये दर राहील, असा अंदाज सांगितला गेला आहे.
व्यापाऱ्यांनी यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल, असे भाकीत वर्तवले आहे. यामुळे विजयादशमीपासून जेव्हा कापसाची आवक वाढेल तेव्हा खरंच कापसाला साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.