Cotton Price : कापूस उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम चांगलाच कष्टदायक राहिला आहे. सुरुवातीला खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे, सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे, तसेच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतिच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. कापूस पिकावर हवामानातील बदलामुळे विपरीत असा परिणाम झाला आणि वेगवेगळ्या रोगांचे चावट पाहायला मिळाले.
विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस पिकावर लाल्या रोगाने अक्षरशः थैमान घातलं होतं. याशिवाय नेहमीप्रमाणे गुलाबी बोंड अळीचे सावट देखील कापूस पिकावर होते. यामुळे शेतकरी बांधवांना या रोगावर नियंत्रण मिळवताना नाकी नऊ आले होते. अनेकांना तर कापूस पीक तसेच सोडावे लागले.
दरम्यान यातून काही शेतकऱ्यांनी आपले कापूस पिक वाचवले मात्र उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादनात घट झाली यामुळे बाजारात चांगला दर मिळेल अशी आशा होती आणि उत्पादनात झालेली घट भरून निघेल असं त्यांना वाटतं होत. विशेष म्हणजे यावर्षी अधिकचा उत्पादन खर्च करून कापूस पीक शेतकऱ्यांनी पदरात पाडलं आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला मौहूर्ताच्या कापसाला 14 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर खानदेशात नमूद करण्यात आला. यामुळे यंदाचा हंगाम कापूस उत्पादकांना मालामाल बनवेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही मुहूर्ताचा कालावधी वगळला तर कापसाला खूपच कमी दर मिळाला आहे. मध्यंतरी बाजारात 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर बराच काळ स्थिरावला होता.
मात्र तदनंतर दरात घसरण झाली. डिसेंबर महिन्यात मात्र साडेसात हजाराचा दर कापसाला मिळत होता. जानेवारीत यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली कापूस दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल च्या घरात गेलेत. दरम्यान आता पुन्हा एकदा कापूस दरात घसरण झाली असून काल झालेल्या लिलावात काही एपीएमसी मध्ये कापसाला मात्र 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.
त्यामुळे कापूस उत्पादकांची गोची होत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता या काळात म्हणजेच मकर संक्रांत नंतर गेल्या वर्षी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर खानदेशात मिळत होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना यंदा देखील दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा किमान दर मिळावा अशी आशा आहे.
मात्र बाजारात कापसाला यापेक्षा कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादकांनी कापसाची साठवणूक केली असून बाजारात कापसाचे आवक खूपच कमी आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी यावर्षी कापसाला आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर कायम राहील असा आशावाद व्यक्त केला आहे.
निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 9500 प्रतिक्विंटल पर्यंतचा दर समाधानकारक नसून त्यांना किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळण्याची अशी आहे. मात्र सध्या मिळत असलेल्या बाजारभावात वाढ होणार असल्याचा तज्ञांचा अंदाज कुठे ना कुठे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ पाहत आहे.