Cotton Price Maharashtra : गेला कापूस हंगाम दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झाला होता. विशेष बाब म्हणजे गेल्या हंगामात मुहूर्ताच्या कापसाला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आणि कापूस पंढरी म्हणून विख्यात असलेल्या जळगाव जिल्ह्यात 11 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा विक्रमी भाव नमूद करण्यात आला होता.
मात्र महूर्ताचा काळ वगळला तर गेल्या हंगामात कापूस बाजार दबावातच राहिला. कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. यामुळे यावर्षी कपाशी लागवड घटणार असा दावा केला जात होता. मराठवाडा, विदर्भ सहित खानदेश मध्ये देखील कपाशीची लागवड कमी होणार असे तज्ञांना वाटत होते.
मात्र, गेल्या वर्षी चांगला भाव नसतानाही यावर्षी कपाशीची लागवड अपेक्षित अशी घटलेली नाही. मोठ्या क्षेत्रावर यावर्षीही कपाशी लावण्यात आली आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदाच्या या नवीन हंगामामध्ये कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
खरतर यंदा भारतातील अनेक राज्यात विशेषता महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या प्रमुख कपाशी उत्पादक भागात कमी पाऊस झाला आहे. यामुळे येथे कपाशी पिकाचा उतारा कमी होणार आहे.
उत्पादनात घट होणार यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पण यंदा कापसाला चांगला भाव मिळाला तर उत्पादनात झालेली ही घट विक्रमी बाजारभावातून भरून काढता येणे शक्य होऊ शकते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असे सांगितले जात आहे.
भाव वाढ होण्याचे कारण
कापूस हे भारत, चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या चार देशात एकूण जागतिक उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा या चारही देशात कपाशीचा उतारा घटणार अशी शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या चारही देशात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे.
विशेषता चीनमध्ये सर्वात जास्त उत्पादन घटणार आहे. चीनमध्ये कापसाचे सर्वात जास्त उत्पादन होते आणि याच देशात याचे उत्पादन घटणार असल्याने याचा परिणाम म्हणून जागतिक उत्पादनात मोठी घट येणार आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक उत्पादन सहा टक्के घटणार असे सांगितले आहे.
तर चीन या सर्वाधिक उत्पादन असलेल्या देशाचे एकूण उत्पादन 12 टक्क्यांनी घटणार आहे. विशेष बाब म्हणजे चीन समवेतच संपूर्ण जगात कापसाचा वापर वाढणार आहे. ब्राझील मधील कापसाचे उत्पादन पाच टक्क्यांनी आणि अमेरिकेतील उत्पादन चार टक्क्यांनी घटनार अशी शक्यता आहे. भारताचे हे उत्पादन दोन टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजेच जगातील सर्वच प्रमुख कापूस उत्पादक राष्ट्रांमध्ये उत्पादन घटणार आहे आणि जगाचा एकूण कापूस वापर या हंगामात वाढण्याची शक्यता आहे. अर्थातच मागणीच्या तुलनेत यंदा पुरवठा कमी राहणार असे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून या हंगामात कापसाला चांगला विक्रमी भाव मिळू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे.