Cotton Price In Maharashtra : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची महाराष्ट्रातील खानदेश मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या विभागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल ते 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत असल्याने यावर्षी या पिकाचा पेरा वाढला आहे.
दरम्यान यंदाच्या हंगामात मुहूर्ताच्या कापसाला कापूस पंढरी म्हणून विख्यात असलेल्या जळगाव जिल्ह्यात 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर इकडे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात 11 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर नमूद करण्यात आला.
मात्र तदनंतर दरात मोठी घसरण झाली. मध्यंतरी कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता. मात्र आता गेल्या एक महिन्यापासून राज्यातील बहुतांशी एपीएमसी मध्ये 8 हजाराच्या आसपास कपाशी विकली जात आहे. मात्र असे असताना महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 9,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे.
यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सधन शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीसाठी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपला मोर्चा वळवला आहे. खरं पाहता, या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात कपाशी पीक चांगले उत्पादन देईल असे वाटत होते. विशेष म्हणजे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव देखील पिकावर आढळत नव्हता यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल शिवाय गेल्यावर्षी सारखा दर मिळेल म्हणून उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते.
मात्र अशातच कपाशी पीक बोंड अवस्थेत आल्यानंतर ढगाळ वातावरण आणि अतिवृष्टीमुळे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात या रोगामुळे कपाशी पिकाच्या उत्पादनात घट झाली. उत्पादनात घट झाली तर झाली मात्र आता वाढीव दरातून भरपाई काढली जाईल अशी शेतकऱ्यांना अशा होती. झालं देखील तसंच मुहूर्ताच्या कापसाला चांगला दर मिळाला.
14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर कापसाला नमूद झाला. मात्र तदनंतर दरात घसरण झाली. गेल्या एक महिन्यापासून आठ हजार रुपये प्रति क्विंटल चे आसपास कापसाला दर मिळत आहे. काही ठिकाणी यापेक्षाही अधिक दर मिळत आहे मात्र बहुतांशी बाजारात साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता गेल्यावर्षी फरदड कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. यंदा चांगल्या कापसाला तेवढा दर मिळत आहे. यामुळे निश्चितच दरवाढीच्या आशेने बसलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान अकोट एपीएमसी मध्ये गेल्या महिन्याभरापासून 9,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत असल्याने या बाजाराच्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगत आहेत.