Cotton Price Hike : तुम्हीही गेल्या वर्षी खरीप हंगामात कापूस लागवड केली होती का ? हो मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दबावात असलेले कापूस बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून तेजीत आले आहेत. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार अशी आशा आहे.
हंगामाच्या शेवटी का होईना पण दरवाढ झाली असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतं आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरू झाला. मात्र तेव्हापासून बाजारभाव दबावात होते. शेतकऱ्यांना कापसाच्या दरात आज ना उद्या वाढ होईल अशी आशा होती.
पण शेतकऱ्यांची ही आशा आता हंगाम संपतं असतांना पूर्ण होत आहे. परंतु, आता फारच कमी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून कमी बाजार भाव असतानाच आपल्याकडील कापूस विकावा लागला आहे.
त्यामुळे दरात वाढ होत असली तरी देखील याचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे.गेल्या महिन्यात कापसाला सरासरी साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत होता. मात्र आता कापसाचा सरासरी भाव 7500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे.
अर्थातच बाजारभावात एक हजार रुपयांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे त्यांना दिलासा मिळत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी पैशांची निकड असल्याने आपला कापूस आधीच विकून टाकला आहे.
त्यामुळे याचा फायदा नेमका शेतकऱ्यांना होणार का हा मोठा प्रश्न आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांकडे आता कापूस शिल्लक असेल त्यांना या दरवाढीचा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
या हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच अर्थातच सप्टेंबर 2023 मध्ये कापसाला जळगाव जिल्ह्यात 8000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळत होता.
मात्र त्यावेळी शेतकऱ्यांनी कापूस बाजार भावात आणखी वाढ होईल म्हणून कापसाची विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवले. मात्र बाजारभावात सप्टेंबर 2023 नंतर सातत्याने घसरण पाहायला मिळाली. गेल्या महिन्यात तर बाजार भाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले होते.
आता मात्र यामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली असून बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या स्थितीला कापसाला सात हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.
परंतु अकोला जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. अकोला जिल्ह्यात कापसाला 8200 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळतोय. यामुळे हंगामाच्या शेवटी का होईना कापूस उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.