Cotton Price : कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता कापूस दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेषता डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. डिसेंबरच्या शेवटी मात्र साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर कापसाला मिळत होता.
मात्र यामध्ये थोडीशी वाढ जानेवारीमध्ये नमूद करण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोट सारख्या प्रमुख बाजारात कापसाला 9000 चा कमाल दर मिळू लागला होता. मात्र यामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली. सद्यस्थितीला महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात कापसाला 8 हजार ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळत आहे.
काही ठिकाणी मात्र याहीपेक्षा कमी दर आहे. दरम्यान आता तज्ञ लोकांनी कापूस दरात वाढ होईल असा आपला अंदाज बांधला आहे. गेल्यावर्षी मार्च एप्रिल मध्ये कापूस दरात वाढ झाली असल्याने यंदा देखील तशीच दरवाढ अपेक्षित आहे. जाणकार लोकांनी देखील मार्च आणि एप्रिल मध्ये यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
खरं पाहता गत हंगामात कापसाला चांगला दर मिळाला असल्याने या हंगामात कापसाची लागवड शेतकऱ्यांकडून वाढवण्यात आली. गत हंगामाप्रमाणे याही हंगामात चांगला दर मिळेल आणि पदरी दोन पैसे अधिक शिल्लक राहतील असा शेतकऱ्यांचा मानस होता. मात्र तसं काही झालं नाही, सध्या स्थितीला कापूस दर दबावात असून याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे शिवाय उत्पादन देखील कमी मिळाले आहे. उत्पादनात घट झाली असल्याने सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विक्री परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांची कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळेल अशी आशा आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू शकतो की, केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत म्हणजे हमीभाव 6 हजार 380 रुपये ठरवून दिला आहे. परंतु या हमीभावात कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात असून भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ञ लोकांनी देखील कापूस दरात वाढ होईल अस भाकित वर्तवल आहे.