Cotton Price : राज्यात सर्वत्र कापूस वेचणी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कापसाची उचल बांगडी देखील झाली आहे. सध्या कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे.
शेतकरी बांधवांना भावात अजून वाढ होईल अशी आशा असल्याने त्यांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे, यामुळे बाजार समितीत आवक मोठी कमी आहे. अशा परिस्थितीत कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळणार असल्याचे भाकीत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
उद्योग जगताकडून कापसाची मागणी वाढली असल्याने कापसाचे दर सध्या तेजीत आहेत. परंतु असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दर फारच कमी आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या बाजारात कापसाला बरा दर मिळतोय. सरकीच्या दरात वाढ झाली असल्याने कापसाला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.
जाणकार लोकांच्या मते आगामी काही दिवस शेतकऱ्यांना 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळू शकतो, यामुळे शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचे गणित समजून टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. खरं पाहता शेतकरी बांधव गेल्या वर्षी प्रमाणे कापसाला उच्चांकी बाजार भाव मिळेल म्हणून कापसाची साठवणूक करत आहेत.
मात्र जाणकार लोकांच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला दर कमी राहणार आहेत. देशातील कापूस उत्पादनात वाढ झाली असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजार भाव खाली आले असल्याने देशांतर्गत कापूस दर दबावात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर चढे होते यामुळे देशांतर्गत कापूस बाजार भाव चांगला मिळत होता.
गेल्यावर्षी दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 15000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर कापसाला मिळाला यावर्षी मात्र 8000 रुपये प्रति क्विंटल ते 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर कापसाला मिळत आहे. आगामी काळात देखील कापसाचे दर असेच टिकून राहणार आहेत.
यावर्षी वस्त्रोद्योगात मंदीचे सावट असल्याने तसेच भारतातून कापूस निर्यात कमी होत असल्याने दरात घसरण झालेली आहे. खरं पाहता भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण कापसांपैकी 50 टक्के कापूस एकट्या बांगलादेशला जात असतो, मात्र सध्या बांगलादेशमध्ये संकट असल्याने मागणी कमी झाली आहे. साहजिकच निर्यातीचा देखील देशांतर्गत कापूस बाजारभावावर परिणाम होत आहे.