Cotton Market Update : कापूस उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून कापसाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे संकटात सापडले आहेत. सध्या दबावात असलेले कापूस दर शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहेत.
गेल्या हंगामात कापसाला 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला असल्याने आणि या हंगामाच्या सुरुवातीला मुहूर्ताच्या कापसाला खानदेश मध्ये 14 हजार रुपये प्रति क्विंटल आणि मराठवाड्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला असल्याने कापसाला निदान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळेल यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक करून ठेवली.
मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा सध्या फोल ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी कापसाला नऊ हजार रुपयाचा सरासरी दर मिळू लागला होता. मात्र डिसेंबर महिन्यात दरात मोठी पडझड झाली. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठेत कापसाला मात्र साडेसात हजाराचा दर मिळाला. जानेवारी महिन्यात मात्र परिस्थिती थोडीशी बदलली कापूस दरात थोडी वाढ झाली.
अकोट सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कापसाने 9 हजाराचा कमाल बाजारभावाचा टप्पा पार केला. मात्र आता गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा एकदा कापूस दर दबावात आले आहेत. 8300 ते 8500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव सध्या बाजारात मिळत आहे.
सरासरी बाजार भाव मात्र 8,100 ते 8200 दरम्यान स्थिरावलेला आहे. विशेष म्हणजे जाणकार लोकांनी 14 जानेवारी नंतर कापूस दरात वाढ होईल असा अंदाज बांधला होता. मात्र जानेवारी महिन्यातील दरवाढीचा अंदाज फोल ठरला आहे.
जाणकारांच्या मते सद्यस्थितीला कापसाच्या रुईचे आणि सरकीचे दर गडगडले आहेत. गेल्या हंगामात कापसाला प्रतिखंडी एक लाख रुपयाचा दर मिळत होता. यंदा मात्र ६१ हजार रुपये प्रतिखंडी असा दर नमूद केला गेला आहे. आणि सरकीचे दर तीन हजार आठशे रुपये पर्यंत खाली आले आहेत. शिवाय यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आयात शुल्क माफ करून वीस लाख कापूस गाठीची आणि सुताची आयात देशात झाली आहे.
परिणामी देशांतर्गत कापूस साठा वाढला आहे. यामुळे सध्या स्थितीला बाजारात कापसाचे दर साडेआठ हजाराहून कमी आहेत. दरम्यान आता मार्चमध्ये भाव वाढीची अपेक्षा आहे. मात्र जर मार्चमध्ये दरवाढ झाली नाही तर शेतकऱ्यांना सध्या स्थितीत जो भाव मिळत आहे त्या दरात विक्री करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो असे सांगितले जात आहे.