Cotton Market Price Maharashtra : कापूस अर्थातच कपाशी हे पीक महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. कापसाला पांढरे सोने म्हणूनही ओळखले जाते. परंतु गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही.
यामुळे यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळेल का हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान राज्यातील खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात नवीन हंगामातील कापूस बाजारात येऊ लागला आहे. परंतु ज्याप्रमाणे गेल्यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला विक्रमी भाव मिळाला होता तसा भाव यंदा कुठेच मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. पण खाजगीमध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. दरम्यान, आता रब्बी हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना भांडवलासाठी पैशांची गरज आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आगात म्हणजेच लवकर कापसाची पेरणी केली होती ते शेतकरी बांधव कापसाची वेचणी करून थेट कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. काही ठिकाणी खेडा खरेदी सुरू आहे. खेडा खरेदीच्या माध्यमातून स्थानिक खाजगी व्यापारी कापसाची खरेदी करत आहेत.
मात्र अजूनही नवीन कापसाची आवक खूपच कमी आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे कापसाची खरी आवक विजयादशमी अर्थातच दसऱ्यानंतर वाढेल. यानंतर खऱ्या अर्थाने कापसाला काय भाव मिळेल यावरच कापसाचे संपूर्ण गणित अवलंबून राहणार आहे.
तूर्तास मात्र राज्यातील काही बाजारात कापसाची थोड्याफार प्रमाणात आवक होत आहे. खानदेश मधील आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच 8 ऑक्टोबर रोजी एच फोर मध्यम स्टेपल कापसाची 105 क्विंटल आवक झाली होती.
या मालाला किमान 7300, कमाल 7350 आणि सरासरी 7330 एवढा भाव मिळाला होता. शेतकऱ्यांची कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे. यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांच्या अपेक्षेएवढा भाव मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.