Cotton Market News : सध्या बाजार समितीमध्ये कापसाला खूपच कमी भाव मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कापसाची आवक ऑगस्ट महिना उजाडला तरी देखील विक्रमीच आहे. खरंतर दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कापसाची आवक खूपच कमी राहते. पण यंदा परिस्थिती भिन्न आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात बाजारात कापसाची तब्बल 25000 गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सरासरी 4000 गाठींच्या दरम्यान आवक होत असे. याचाच अर्थ ऑगस्ट महिना हा कॉटन मार्केटचा ऑफ सीजन असतो. यंदा मात्र ऑगस्ट महिन्यात देखील जवळपास 20 ते 21 हजार गाठींची अधिक आवक होत आहे. साहजिकच बाजारात नेहमीच्या तुलनेत सध्या आवक अधिक आहे. याचा परिणाम म्हणून बाजार समित्यांमधील बाजारभाव दबावात आले आहेत.
खरंतर या चालू हंगामात ऑक्टोबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत बाजारातील आवक ही नेहमीपेक्षा कमी होती. मात्र मार्च महिन्यापासून आवक मध्ये वाढ झाली. मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत बाजारात कापसाची विक्रमी आवक होत आहे. भाववाढीच्या आशेने सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. मात्र बाजारभावात सुधारणा झाली नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापासून मिळेल त्या भावात कापसाची विक्री करण्यास पसंती दाखवली आहे. यामुळे मार्च महिन्यापासून कापूस बाजारावरील दबाव आणखी वाढत गेला आहे. तसेच सध्या कापसाला आणि सुताला देखील बाजारात अपेक्षित अशी मागणी नाहीये. याचा परिणामही दरावर झाला आहे आणि दर दबावात आहेत. मात्र अशातच कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे देशातील कापसाच्या वायदे बाजारात आता वाढ होऊ लागली आहे. आज वायदे बाजारात कापसाचे भाव 580 रुपयांपर्यंत वाढले होते. आज वायदे बाजारात 59 हजार 580 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. वास्तविक गेल्या दोन आठवड्यांपासून वायदे बाजारात भाव वाढत आहेत. मात्र बाजार समितीमध्ये भाव अजूनही स्थिर आहेत.
सध्या बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे दरम्यान दर मिळत आहे. मात्र आता या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळू शकते. या चालू ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बाजारभाव वाढतील असा अंदाज आहे. येत्या एक दोन आठवड्यात आवक कमी होईल आणि याचा परिणाम म्हणून दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त यावर्षी मान्सून काळात कमी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
आतापर्यंत जरी सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी देखील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडणारा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होईल आणि यामुळे आगामी काळात कापसाच्या बाजाराला आधार मिळेल, दरात वाढ होईल असं भाकित वर्तवल जात आहे.