Cotton Market News : कापूस हे भारतात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन प्रांतात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड यावर्षी झाली आहे.
गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने यंदा देखील कापूस विक्रमी दरात विक्री होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. विशेष म्हणजे सुरुवातीला कापसाला चांगला दर देखील मिळाला होता.
खानदेशमध्ये महूर्ताचा कापूस 14 हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी दरात विक्री झाला होता. मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये देखील मुहूर्त प्रसंगी कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला होता.
मात्र तदनंतर कापूस दरात घसरण झाली. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता, तसेच कमाल बाजारभाव साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद झाला होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कापूसदाराला जे ग्रहण लागलं ते आत्ता कुठे थांबताना पाहायला मिळत आहे.
डिसेंबरच्या शेवटी कापसाला मात्र साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. मात्र या आठवड्यात देशाअंतर्गत बाजारात रोजाना वाढ पाहायला मिळाली आहे. खरं पाहता जागतिक बाजारात कापूस दरात चढ-उतार होत होती मात्र देशांतर्गत भाववाढ होत होती.
या आठवड्यात सुरुवातीला म्हणजे दोन जानेवारी रोजी कापसाला सात हजार सहाशे ते आठ हजार सहाशे दरम्यान भाव मिळाला होता. दरम्यान आज झालेल्या लिलावात देशातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाने नवजाराचा पल्ला गाठला. राज्यातही काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कापूस दरात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात वाढ झाली. एकंदरीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा होत असल्याने कापूस दरवाढीसाठी भविष्यात अनुकूल परिस्थिती तयार होत असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.
सध्या जी परिस्थिती तयार झाली आहे त्यामुळे येत्या आठवड्यात कापूस दरात सुधारणा होऊ शकते अशी आशा तज्ञ लोकांनी व्यक्त केली असल्याने कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.