Cotton Market : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना या हंगामात घटत्या दराचा मोठा फटका बसला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात कापसाला खूपच कमी दर मिळत आहे. खरं पाहता गत हंगामात कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता. विशेष म्हणजे या हंगामाच्या सुरुवातीला देखील कापसाला चांगला दर मिळाला. सुरुवातीला औरंगाबाद मध्ये कापूस 11 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री झाला. तदनंतर मात्र कापूस दरात घसरण झाली.
मध्यंतरी कापूस 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भाव पातळीवर विक्री होऊ लागला. मात्र डिसेंबर अखेर कापूस दरात दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण झाली. काही ठिकाणी 7000 ते काही ठिकाणी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव कापसाला मिळाला. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात मात्र पुन्हा एकदा कापूस दरात सुधारणा झाली. नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव काही बाजारात नमूद करण्यात आला.
परंतु दरात झालेली ही वाढ अधिक काळ टिकू शकली नाही. सध्या स्थितीला कापूस महाराष्ट्रात आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. सरासरी बाजार भाव राज्यातील बहुतांशी बाजारात याहीपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कापूस विक्री परवडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापूस दरात चढ-उतार होत आहे. मात्र सरासरी भाव गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात स्थिर असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत महाग होता मात्र सद्यस्थितीला भारतीय बाजारात कापूस दरात घसरण झालेली असल्याने जागतिक बाजारातील कापूस महाग बनला आहे.
देशाअंतर्गत बाजारात काल झालेल्या लिलावात कापूस दरात घटच पाहायला मिळाली. दरम्यान जाणकार लोकांनी कापूस दरात वाढ होण्याची आशा मात्र व्यक्त केली आहे. सध्या कापसाचे भाव नरमलेले असल्याने देशातून निर्यात वाढत असल्याचे चित्र आहे. देशांतर्गत सध्या आठ हजार ते आठ हजार तीनशे दरम्यान कापसाला दर मिळत आहे. रुईचे भाव 17400 एवढं खाली आल्याने रुईला उठाव मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र रुईचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 18 हजार पाचशे रुपये प्रमाणे रुईचे सौदे होत आहेत. म्हणजेच देशांतर्गत बाजारापेक्षा जागतिक बाजारात रुईचे आणि कापसाचे भाव अधिक आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारात देखील जागतिक बाजारात आलेली तेजी आपला प्रभाव सोडेल आणि लवकरच दरात वाढ होईल असा एक अंदाज तज्ञ बांधत आहेत.
सध्या स्थितीला चायना आणि पाकिस्तान या दोन देशातून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. चायना मध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असून पाकिस्तानात कापसाचे उत्पादन कमी झाले असल्याने त्या ठिकाणी कापसाची आयात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन देशात मोठ्या प्रमाणात आयात कापसाची होईल परिणामी जागतिक बाजारात तेजी राहील आणि याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसेल, कापूस दरात वाढ होईल.
विशेष म्हणजे आता 13 फेब्रुवारीपासून वायदे देखील सुरू होणार आहेत. याचा देखील दरावर सकारात्मक असा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जाणकार लोकांनी कापूस दरवाढीचा अंदाज बांधला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात चालू आठवड्यात कापूस दर कमी होते. शिवाय मार्च एंडिंग जवळ येत असल्याने शेतकरी बांधवांना आपली देणी देखील फेडायची आहेत.
यामुळे कासाचे दर कमी होत असले तरी देखील कापसाचीं आवक मात्र वाढू लागली आहे. बाजारातील आवक या आठवड्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीशी जास्त होती. विशेष म्हणजे आता उद्योगही या दरात शेतकरी कापूस विकतील, याची वाट पाहत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, भारतीय कापसाची होणारी निर्यात, सुतगिरण्या आणि कापड उद्योगाची मागणी यामुळं कापूस दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजार अभ्यासकांच्या मते या हंगामात कापसाला साडेआठ हजार रुपये ते साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळू शकतो. यामुळे शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने आपल्या मालाची विक्री केली तर त्यांना दोन पैसे अधिक शिल्लक राहतील. निश्चितच गेल्या हंगामाप्रमाणे अधिक तेजी या हंगामात नमूद केली जाणार नाही मात्र दरात थोडीशी वाढ झाली तर शेतकऱ्यांना होणारे नुकसान कमी होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
Cotton Rate : शेतकऱ्यांनो, घाई नको ! कापूस दरात वाढ ही अटळ आहे ; वाचा तज्ञांच मत अन आजचे बाजारभाव