Cotton Farming : कापसाला शेतकरी बांधव पांढरे सोने म्हणून ओळखतात. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश ही तीन विभाग कापूस उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते.
याशिवाय गुजरात, तेलंगाना, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. खरतर, कापसाला काळी कसदार जमीन आवश्यक असते.
यामुळे, काळ्या जमिनीला कापसाची काळी कसदार मृदा म्हणून ओळखतात. ज्या ठिकाणी अशी काळी जमीन अधिक असते त्या ठिकाणी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
मात्र तुम्हाला भारतात सर्वात जास्त कापसाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते या विषयी माहिती आहे का ? नाही, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कापसाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?
कापसाचे सर्वात जास्त उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यात काळी जमीन आढळते आणि याच जमिनीत मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जात आहे.
यामुळे कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. विशेष म्हणजे, उत्पादनात देखील आपल्याच राज्याचा पहिला क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात देशाच्या एकूण कापूस उत्पादनापैकी 27.10% एवढे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रनंतर आपले शेजारील राज्य गुजरातचा नंबर लागतो. गुजरात कापूस उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी गुजरात राज्यात 20.55% एवढे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच देशाच्या एकूण उत्पादनापैकी 16.94% एवढे उत्पादन तेलंगणा राज्यात घेतले जात असून हे राज्य कापूस उत्पादनाच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
देशाच्या एकूण कापूस उत्पादनापैकी 9.06% एवढे कापसाचे उत्पादन राजस्थान मध्ये घेतले जाते आणि हे राज्य या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच कर्नाटक मध्ये देशाच्या एकूण कापूस उत्पादनापैकी 6.56% एवढे उत्पादन घेतले जात असून हे राज्य या यादीत पाचव्या क्रमांकावर आले आहे.