Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.
याचे कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. एक तर कापसाचे उत्पादन कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे कापसाला बाजारात चांगला भाव मिळत नाहीये. यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
तथापि यावर्षी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला असल्याने यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असे म्हटले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण कापसाच्या टॉप तीन जातींची माहिती पाहणार आहोत. राज्यातील हवामानासाठी अनुकूल अशा कापसाच्या तीन जाती आज आपण पाहणार आहोत.
कापसाच्या टॉप तीन जाती कोणत्या
महिको बाहुबली MRC 7361 : या जातीची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लागवड केली जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 20 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
या जातीची जिरायती आणि बागायती अशा दोन्ही भागांमध्ये लागवड केली जाऊ शकते. रस शोषक किडीना ही जात प्रतिकारक असल्याचे आढळले आहे.
अजित 199 बीजी II : कापसाची ही देखील जात शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या जातीपासूनही शेतकऱ्यांना 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. जिरायती आणि बागायती अशा दोन्ही भागांमध्ये याची लागवड होत आहे. जिरायतीमध्ये लागवड केली तरी देखील बऱ्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
या जातीचे पीक साधारणता 146 ते 159 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळत असल्याने राज्यातील मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.
इंडो यू 936 BGII : या जातीपासूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. ऍव्हरेज 15 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा होत आहे. या जातींचे पीक 155 ते 160 दिवसात काढण्यासाठी तयार होते.
हलक्या आणि भारी जमिनीत तसेच जिरायती आणि बागायती भागात याची लागवड करता येणे शक्य आहे. राज्यातील हवामान या जातीस अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन मिळत असल्याने अनेकांनी याची लागवड केली आहे.