Cotton Farming : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. तथापि कापूस लागवडीच्या अन उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची लागवड केली जाते.
कपाशीची लागवड ही खरीप हंगामामध्ये केली जाते. आज आपण शेतकरी बांधवांनी कापसाची लागवड केव्हा केली पाहिजे, कपाशी लागवड करताना एकरी किती बियाणे वापरले पाहिजे, कोणत्या जातीची निवड केली पाहिजे ? अशी एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कापसाच्या कोणत्या सुधारित जातींची निवड केली पाहिजे
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात जर शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्यांनी याच्या सुधारित जातींची लागवड केली पाहिजे.
या पिकातून अधिक अन चांगले दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल तर राशी ६५९ (राशी सीड्स), कब्बडी (तुलसी सीड्स), सुपरकोट (प्रभात सीड्स) आणि यु.एस. ७०६७ ( यु.एस. ऍग्रीसीड्स) या वाणांची शेतकऱ्यांनी निवड करावी, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
कापसाची पेरणी केव्हा केली पाहिजे
कृषी तज्ञ सांगतात की, कापूस लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा हा सर्वोत्कृष्ट काळ समजला जातो. या कालावधीत कापसाची लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि इतर विविध रोगांचे अन कीटकांचे देखील प्रमाण कमी राहते.
त्यामुळे याच कालावधीत कापसाची लागवड करावी असा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे. कापूस पिकाच्या सुधारित जातीचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी याची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी.
पण जर कोरडवाहू भागात कापूस लागवड करत असाल तर याची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस झाल्यानंतरच केली गेली पाहिजे असा सल्ला तज्ञांनी यावेळी दिला आहे.
कापूस पेरणीसाठी एकरी किती बियाणे वापरले पाहिजे?
अनेकांच्या माध्यमातून कापूस पेरणीसाठी एकरी किती बियाणे वापरले पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की संकरित कापसाच्या वाणाचे बियाणे पेरणी करायची असेल तर एकरी 800 ते 900 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. म्हणजे एकरी दोन बॅगा पुरेशा होतील.