Cotton Farming : उद्यापासून महाराष्ट्रात कापसाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी कापूस लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन तज्ञांनी केले आहे. कापूस लागवड लवकर झाल्यास गुलाबी बोंड अळीचा धोका वाढत असतो यामुळे कापूस लागवड वेळेवर करणे आवश्यक असते. दरम्यान यावर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे यंदा कापूस लागवडी खालील क्षेत्र वाढणार असा अंदाज आहे. खरंतर कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र असे असले तरी आपल्या राज्यात कपाशीचा एकरी उतारा हा फारच कमी आहे.
देशात रुईची हेक्टरी उत्पादकता 501 किलोग्रॅम आहे. मात्र आपल्या राज्याची हेक्टरी उत्पादकता 349 किलोग्रॅम एवढी आहे. यावरून राज्यात कपाशीचा एकरी उतारा किती कमी आहे हे आपल्या लक्षात येते. खरंतर कपाशी उत्पादनात घट येण्याची अनेक कारणे आहेत.
यातीलच एक महत्त्वाचे आणि पहिले कारण म्हणजे योग्य वाणाची निवड न करणे. त्यामुळे आज आपण कपाशी वाण निवड करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बीटी कापूस वाण निवडतांना खालील गोष्टींची काळजी घ्या
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कपाशीचे वाण निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कृषी तज्ञ असे सांगतात की, कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी नेहमी आपल्या भागात उत्पादनास चांगला असणारा वाण निवडला पाहिजे.
ज्या जातीपासून तुमच्या भागात चांगले उत्पादन मिळत असेल त्या जातींची लागवड करा. आपण निवडणार असाल तो वाण रस शोषण करणा-या किडींना प्रतिकारक्षम अन संकरित असायला हवा, जेणेकरून तुम्हाला कापूस पिकातून चांगले उत्पादन मिळू शकेल.
नेहमी पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडला गेला पाहिजे. कृषी विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त वाणाचीच खरेदी करावी, असा देखील सल्ला तज्ञांनी दिला आहे. कापूस बियाणे खरेदी करताना देखील विशेष काळजी घ्यावी.
बियाणे खरेदीसाठी गेलात तर त्याचे बिल व पॅकेट जतन करून ठेवले पाहिजे. जर तुम्ही बागायती भागात कपाशी लागवड करत असाल तर मध्यम म्हणजे १६० ते १८० दिवस ते दीर्घ कालावधीत येणारे म्हणजे १८० दिवसापेक्षा अधिक कालावधी असणारे वाण निवडले पाहिजेत.
जर समजा तुम्ही कोरडवाहू भागात कपाशी लागवड करणार असाल तर नेहमी लवकर येणारे म्हणजेच 150 ते 160 दिवसात किंवा मध्यम कालावधीत येणारे म्हणजेच 160 ते 180 दिवसात येणारे वाण निवडले पाहिजे.
शक्यतो बागायती भागात जरी लागवड करायची झाली तरी देखील दीर्घ कालावधीच्या वाणांची निवड करू नये. याचे कारण म्हणजे दीर्घ कालावधीच्या कापूस जातींची लागवड केल्यास गुलाबी बोन्ड अळीचा धोका वाढत असतो.