Cotton Farming : तुम्हीही कापसाची लागवड करता का ? मग तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची शेती राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मध्ये कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते.
खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खरे तर कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची कापसाची एकरी उत्पादकता दरवर्षी घटत चालली आहे.
कापसाचे उत्पादन कमी होण्यामागे वेगवेगळे कारणे आहेत. पण, कापसाचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून विदर्भातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञांनी कापसाचे एक नवीन वाण विकसित केले आहे.
पीडीकेव्ही धवल असे या नवीन देशी सुधारित वाणाचे नाव आहे. या वाणाचे प्रसारण नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. खरे तर हा वाण 2022 मध्ये कापूस संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञांकडून कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आला होता.
मात्र, आता हा वाण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यात आला आहे. यामुळे बियाणे प्रसाराचे काम युद्धपातळीवर होणार आहे. याचा महाराष्ट्रासहित इतर कापूस उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या वाणाचे वैशिष्ट्य अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत.
पीडीकेव्ही धवलचे वैशिष्ट्ये नेमके काय?
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाण कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. यापासून कमी पाण्यात चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. दुष्काळ किंवा कमी पाण्याच्या परिस्थितीत या जातीचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
याची कोरडवाहू भागात लागवड केली तरी हेक्टरी 15 ते 16 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळवले जाऊ शकते. हा वाण फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात देखील कोरडवाहू भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
रस शोषक किडींना देखील हा वाण प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. ही एक मेडियम स्टेपल कापसाची जात आहे. याच्या धाग्याची लांबी ही 25 मिलिमीटर एवढी असते.