Cotton Farming : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे भाव सुधारले आहेत. अजून या चालू हंगामातील कापसाची वेचणी सुरू झालेली नाही. साधारणतः विजयादशमीच्या काळात नवीन कापूस बाजारात येत असतो.
यंदाही याच काळात नवीन कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र हा नवीन माल बाजारात दाखल होण्यापूर्वीच सध्याच्या मालाचे दर वाढलेत. तथापि, बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव अजूनही स्थिर आहेत.
कापसाचे वायदे काल आंतरराष्ट्रीय बाजारात ७०.०५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तसेच, देशातील वायदे वाढून ५९ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर पोहचले होते. पण, देशांतर्गत बाजारात मात्र बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.
बाजार समित्यांमध्ये आज ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजार अभ्यासकांनी आगामी काही दिवस कापूस बाजाराची अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असेही आवर्जून नमूद केले आहे.
तरीही, नवीन माल बाजारात दाखल होण्यापूर्वीच वायदे बाजारात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अशातच कृषी क्षेत्रातील जाणकार अन एका खाजगी कंपनीचे मुख्य कापूस पैदासकार डॉ. एस.एस. माने यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी एक कामाचा सल्ला दिला आहे.
कमी खर्चात कापूस पिकातून अधिकचे उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी मल्चिंग चा म्हणजेच आच्छादनाचा वापर करावा असा सल्ला दिला आहे. अतिघन लागवड कापूस पिकात कमी मजुरीत तसेच अत्यंत कमी खर्चात दीडपट उत्पादन घेता येऊ शकते.
पण अशा लागवडीत अच्छादन हा अतिशय चांगला पर्याय आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. अच्छादन केल्यास कापूस पिकातील अंतर मशागत करण्याची गरज पडत नाही. कापसामध्ये रोग व कीड अत्यंत कमी होऊन उत्पादन तसेच कापसाची प्रत सुधारण्यास मदत मिळते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
कापूस महाराष्ट्रातील मुख्य पीक
कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड होते. पश्चिम महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड उल्लेखनीय आहे. कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो.
मात्र जेव्हा उत्पादनाचा विषय निघतो तेव्हा महाराष्ट्र फारच पिछाडीवर असल्याचे दिसते. राज्याची कापसाचे उत्पादकता म्हणजेच कापसाचे एकरी उत्पादन फारच कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस पिकातून अपेक्षित कमाई होत नाही.