Cotton Farming : भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणारा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाचा मान्सून हा समाधानकारक राहणार आहे. परिणामी यावर्षी खरीप हंगामामध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र किंचित वाढेल अशी आशा व्यक्त होत आहे. कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे कॅश क्रॉप आहे.
याची लागवड राज्यातील जळगाव सहित संपूर्ण खानदेश मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांचे बहुतांशी अर्थकारण कापूस पिकावरच अवलंबून आहे. दरम्यान, जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे.
कारण की, आज आपण कापसाच्या अलीकडेच विकसित झालेल्या तीन नवीन जातींची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे या नव्याने विकसित झालेल्या जाती यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात असा अंदाज आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या कापूस संशोधन केंद्राने नुकतेच आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर आणि प्रचंड मेहनती नंतर कापसाचे तीन सरळ बीटी वाण तयार केले आहेत.
विशेष म्हणजे केंद्राच्या समितीने या वाणाला मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस केली आहे. कृषी विद्यापीठाने एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ या तीन कापसाच्या जाती विकसित केल्या आहेत.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कोरडवाहू भागात लागवड केली तरीही यातून दर्जेदार उत्पादन मिळू शकणार आहे. या कापसाच्या मध्यम धाग्याच्या जाती आहेत.
रसोशक किडींसाठी या तिन्ही जाती प्रतिकारक असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांमध्ये करोडो भागातील शेतकऱ्यांसाठी या जातीचे कापूस वाण विशेष फायदेशीर ठरणार असा दावा कृषी संशोधकांनी केला आहे.
या जातीपासून हेक्टरी 16 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असे देखील संशोधकांनी म्हटले आहे. निश्चितच कोरडवाहू भागात या तिन्ही जाती चांगले उत्पादन देण्यास सक्षम राहणार असल्याने याचा राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे तीनही वाण बीटी स्वरुपातील आहेत आणि हे वाण हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी प्रतिकारक राहणार असे संशोधकांनी सांगितले आहे. यामुळे या जातीपासून अधिकचे उत्पादन मिळणार अन उत्पादन खर्चात बचत होणार आहे.