Cotton Farming : महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. खरेतर राज्यातील मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तसेच खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कापसाची लागवड पाहायला मिळते.
हे 20 जिल्हे कापसाच्या लागवडीसाठी विशेष ओळखले जातात. अर्थातच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र राज्यातील कापसाची एकरी उत्पादकता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे. यामुळे राज्यातील कापूस उत्पादकांसाठी कापसाचे एक नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने हा नवीन वाण विकसित केला आहे. या संशोधन संस्थेने सर्जिकल कापसाची नवीन जात विकसित केली आहे.
म्हणजेच या कापसाचा वैद्यकीय क्षेत्रात वापर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात या कापसाचा उपयोग होत असल्याने याला चांगला भाव मिळणार आहे. या कापसाची विशेषता म्हणजे याची पाणी शोषून ठेवण्याची क्षमता ही अधिक आहे.
विशेष म्हणजे या जातीच्या कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. मागणीप्रमाणे संस्थेकडून बियाणे पुरवले जाणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कापसाचा हा वाण हलक्या जमिनीसाठी देखील उपयुक्त राहणार आहे.
खरेतर, राज्यात 35 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे हलक्या जमिनी आहेत. पण हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली तर पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.
मात्र नव्याने विकसित झालेला हा कापूस वाण हलक्या जमिनीत देखील लावता येतो. या कापसाची कोरडवाहू भागात आणि हलक्या जमिनीत लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
या कापसाची दाट लागवड करता येणे शक्य आहे. नव्याने विकसित झालेले कापसाचे हे वाण 120 ते 140 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे या जातीपासून हेक्टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
निश्चितच कापसाचा हा वाण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेषता ज्यांच्याकडे हलक्या आणि कोरडवाहू जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.