Cotton Farming : महाराष्ट्रात कपाशीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कपाशीला पांढर सोनं म्हणून ओळखलं जातं. गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला असतानाही कपाशी लागवडीखालील क्षेत्र खूपच अधिक राहिले होते. यंदा तर भारतीय हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे साहजिकच कपाशी लागवडीखालील क्षेत्र आणखी वाढणार असा अंदाज आहे. कापूस पीक लागवडी बाबत बोलायचं झालं तर याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश या तीन विभागांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते.
पश्चिम महाराष्ट्रात देखील कापूस लागवड केली जाते. मात्र येथील कापूस लागवडीखालील क्षेत्र हे कमी आहे. पण, खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. एका शासकीय आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील लागवडयोग्य जमिनीपैकी 75 टक्के जमिनीवर कापसाची लागवड केली जाते.
यामुळेच जळगाव जिल्ह्याला कापसाचे आगार म्हणतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी अधिकचा उत्पादन खर्च करावा लागतोय.
याचे कारण म्हणजे कापसाच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गुलाबी बोंड अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. दरम्यान या कीटकांच्या आणि रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांना फवारणीवर अधिक पैसा खर्च करावा लागत आहे.
म्हणजे अधिकचा उत्पादन खर्च करावा लागतोय. उत्पादन खर्चात जवळपास 30% पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळाले तरीदेखील शेतकऱ्यांना कापसाचे पीक फायदेशीर ठरत नाही ही वास्तविकता आहे.
हेच कारण आहे की आता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी कापसाच्या पिकात आंतरपीक घेण्याचा सल्ला दिला आहे. फक्त कपाशीची लागवड केली तर उत्पादन खर्च वाढेल आणि अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.
मात्र जर या पिकात तूर, मूग व उडीद यांसारख्या कडधान्य पिकांची आंतर पिक म्हणून लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकची कमाई होऊ शकणार आहे. आंतरपिक म्हणून कडधान्याचा समावेश केल्यास अनेक फायदे मिळतात.
यामुळे जमिनीची धूप कमी होते, जमिनीची सुपिकता वाढते, एकात्मिक कीड व्यवस्थापन होते म्हणजेच गुलाबी बोंड आळी सारख्या किडींवर यामुळे नियंत्रण मिळवता येते, उत्पादन खर्च कमी होतो अन उत्पन्नात वाढ होते.
यामुळेच कृषी तज्ञांनी फक्त कपाशी लागवड करण्याऐवजी कपाशी पिकात कडधान्य पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी असा सल्ला यावेळी दिला आहे.