Cotton Farming In Maharashtra : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागात सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा मात्र कापूस उत्पादकांना अपेक्षित असा भाव मिळाला नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
मात्र मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने कापसाचे एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे की या कमी भावात देखील या शेतकऱ्याला लाखो रुपयांची कमाई झाली आहे. जालना जिल्ह्यातील मौजे दाहिफळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दोन एकरात चक्क 65 क्विंटल कापसाचे उत्पादन घेऊन दाखवले आहे.
वास्तविक जालना जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी कपाशीचे पीक फार पूर्वीपासून घेत आहेत. दाहिफळ व आजूबाजूच्या परिसरात देखील कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
दाहिफळ येथील शेतकरी विठ्ठल काळे हे देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे कपाशीची शेती करतात. यंदा मात्र काळे यांनी कापूस पीकाचे योग्य नियोजन करत दोन एकरातून तब्बल 65 क्विंटलचे उत्पादन घेतले आहे. यामुळे काळे यांची सध्या परिसरात चर्चा आहे.
हे पण वाचा :- काश्मीरच सफरचंद महाराष्ट्राच्या मातीत फुलल; प्रयोगशील शेतकऱ्याने फक्त 100 झाडातून कमवले दिड लाख, वाचा….
काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पारंपारिक पद्धतीने कपाशी लागवड करण्यापूर्वी शेतीची पूर्व मशागत केली. जमीन नागरल्यानंतर त्यामध्ये एकरी दोन ट्रॉली शेणखत टाकले. यानंतर मग जमिनीची रोटर मारून मशागत करण्यात आली. यानंतर पूर्व मशागत झालेल्या जमिनीत बसंत आणि नवनीत या दोन कापूस जातीची लागवड त्यांनी केली.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 15 जून 2022 ला साडे चार बाय दीड फुटावर कापूस लागवड करण्यात आली. कपाशीची लागवड मात्र चांगला पाऊस पडल्यानंतरच करावी असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे. त्यांनी देखील तसंच काहीसं केलं यामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळवता आल आहे.
ते सांगतात की, कापूस लागवड झाल्यानंतर त्यांनी पिकाला खताचे तीन डोस दिले. यामध्ये सुरुवातीला 20-20-00-13 नंतर डीएपी आणि शेवटी प्लांटो अशा प्रकारे खत व्यवस्थापन त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच एकाच कीटकनाशकाचा वापर वारंवार त्यांनी केला नाही.
मावा तुडतुडे या कीटकाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी उलाला या कंपनीचे कीटकनाशक वापरले. तसेच पिकाच्या वाढीसाठी तसेच पात सेटिंग करण्यासाठी त्यांनी गायत्री परफेक्ट हे औषधं वापरले. अशा पद्धतीने योग्य नियोजन केल्यामुळे त्यांना डिसेंबर अखेरपर्यंत कापूस पिकातून 40 क्विंटलचे उत्पादन मिळाले.
यानंतर त्यांनी फरदड कापूस घेतला आणि यातून जवळपास 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन त्यांना हाती आले आहे. निश्चितच कापसाला यंदा अपेक्षित भाव मिळाला नाही. मात्र तरीही त्यांना या दोन एकरातून पाच लाखांपर्यंतची कमाई होणार आहे. जर गेल्या वर्षी प्रमाणे चांगला भाव राहिला असता तर कमाईचा आकडा आणखी वाढला असता असं देखील त्यांनी सांगितलं.
एकंदरीत काळे यांनी कपाशी पिकातून मिळवलेले हे दर्जेदार उत्पादन इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. जर शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाच्या शेतीत योग्य नियोजन केले तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शकते हेच या प्रयोगातून पुन्हा सिद्ध होत आहे.
हे पण वाचा :- नागपूर-मुंबई रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ रेल्वेच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, पहा….