Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनाच्या बाबतीत संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. कापूस हे राज्यात खरीप हंगामामध्ये उत्पादित होणारे सर्वात मोठे नगदी पीक आहे. याच्या लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे या पिकाचे एकरी उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे कपाशीचे हे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे वास्तव आहे.
तथापि कृषी शास्त्रज्ञांनी कपाशीच्या अशा काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
दरम्यान, आज आपण कपाशीच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत. ICAR च्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च महाराष्ट्र या संस्थेने कापसाच्या विविध जाती विकसित केल्या आहेत.
यामध्ये सुरक्षा कॉटन या जातीचाही समावेश होतो. मध्य भारतात आणि दक्षिण भारतात कापसाच्या या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान, आज आपण याच जातीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुरक्षा कॉटन कापसाच्या विशेषतां
कापसाची ही एक सुधारित जात आहे. कापसाची ही जात 165 दिवसात परिपक्व होते. या जातीची मध्य आणि दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
या जातीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. कापसाच्या या वाणापासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
या जातीच्या कापसाच्या धाग्याची लांबी 32 मी मी एवढी आहे. या जातीपासून उष्ण व दमट हवामानात देखील चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. विविध प्रकारच्या जमिनीत कापसाच्या या जातीची लागवड करता येणे शक्य आहे.
उत्तरेकडील निचरा होणारी खोल गाळाची माती, मध्य प्रदेशातील काळी माती आणि दक्षिणेकडील काळी आणि लाल मिश्रित मातीच्या जमिनीत कापसाच्या या वाणाची लागवड करता येणे शक्य आहे.