Cotton And Soybean Market Price : कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे दोन महत्त्वाचे नगदी पीक. या पिकाच्या लागवडीचा विचार केला असता राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या तीन विभागांमध्ये या दोन्ही पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन आणि कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.
बाजारात मिळत असलेला नगण्य भाव पाहता गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाही. दरवर्षी कापसाचे नवीन पीक विजयादशमीच्या सुमारास बाजारात येत असते.
म्हणजे यंदा कापसाचे नवीन पीक येण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. यंदाही विजयादशमीपासून नवीन कापसाची आवक होणार आहे. अशातच राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
जर तुम्ही ही यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन माल बाजारात येण्यापूर्वीच कापसाच्या बाजारभावात चांगली सुधारणा झाली आहे.
यामुळे जेव्हा नवीन कापूस बाजारात येईल तेव्हाही कापसाला चांगला दर मिळणार अशी आशा व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
सध्या कापसाला काय दर मिळतोय ?
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आज कापूस बाजारात आशादायी चित्र तयार झाले आहे. आज 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारपर्यंत देशात आणि आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे.
कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत ७०.०५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तसेच, देशातील वायदे वाढून ५९ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर पोहचले होते. पण, देशांतर्गत बाजारात मात्र बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.
बाजार समित्यांमध्ये आज ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बाजार अभ्यासकांनी आगामी काही दिवस कापसाच्या भावातील ही स्थिती कायम राहणार आहे.
सोयाबीन बाबत बोलायचं झालं तर आज देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळाला आहे.
तसेच देशातील प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आज ४६०० ते ४७७५ रुपयांच्या दरम्यान होते. पण, शेती क्षेत्रातील तज्ञांनी सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार होऊ शकते असा अंदाज दिला आहे.