Cidco News : मुंबई, नवी मुंबई सारख्या परिसरात घरांच्या किमती गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणून सर्वसामान्य जनता या भागात घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असते. नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी दरवर्षी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.
यासाठी सिडको दरवर्षी लॉटरी काढत असते. यंदाही प्राधिकरणाच्या माध्यमातून विजयादशमीच्या मुहूर्तावर एक मोठी लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. सिडको तब्बल चाळीस हजार घरांसाठी आगामी काळात लॉटरी जाहीर करणार अशी बातमी समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर सिडकोच्या या घरांचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर निघणाऱ्या सिडकोच्या आगामी सोडतीमध्ये या घरांचा समावेश केला जाणार आहे.
नवी मुंबईतील खांदेश्वर, जुईनगर, वाशी, नेरुळ, सानपाडा, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वेस्थानकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घरांचा सिडकोच्या आगामी लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण नवी मुंबईच्या लोकांना सिडकोचे घर खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण सिडकोच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा ? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सिडकोच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
सिडकोच्या आगामी सोडतीसाठी इच्छुक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. यासाठी https://lottery.cidcoindia.com नागरिकांना या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर फॉर लॉटरी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
मग, तुमचा सध्याचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचे तपशील यांसारखी माहिती भरायची आहे. वेबसाइटवर नमूद केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करायची आहेत.
आता तुम्ही जो अर्ज भरला आहे तो अर्ज एकदा काळजीपूर्वक वाचून त्याला सबमिट करायचे आहे. मग तुम्हाला नोंदणी शुल्क भरायचे आहे आणि तुम्ही ज्या उत्पन्न गटातून अर्ज करणार असाल त्यानुसार तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावे लागणार आहे.
अशा तऱ्हेने तुमचा अर्ज भरला जाणार आहे. एकदा अर्ज भरला की तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट आऊट काढायची आहे आणि ती प्रिंटआउट जोपर्यंत तुम्हाला घर लागत नाही किंवा जोपर्यंत लॉटरी निघत नाही तोपर्यंत सांभाळून ठेवायची आहे.
कोण कोणती कागदपत्रे लागणार
अर्जदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो, अर्जदारांचा संपर्क तपशील जसे की मोबाईल नंबर, ईमेल आयडी तसेच बँकेचा तपशील म्हणजेच बँकेचे अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड सारखी डिटेल्स तुम्हाला अर्ज भरताना प्रोव्हाइड करावी लागणार आहे.