Cidco Lottery News : मुंबई, नवी मुंबई सह राज्यभरातील महानगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महानगरांमध्ये घरांच्या वाढत असलेल्या किमती पाहता या शहरांमध्ये घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. मात्र अशा या परिस्थितीत सिडको आणि म्हाडाच्या घरांचा सर्वसामान्यांना मोठा आधार मिळत आहे.
सिडको आणि म्हाडाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान नवी मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडको प्राधिकरण नवी मुंबई मधील 40 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
यामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या चाळीस हजार घरांसाठीचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून याच घरांसाठी पुढील महिन्यात येणाऱ्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सिडको प्राधिकरणाकडून लॉटरी जाहीर केली जाणार आहे.
सिडकोच्या या आगामी सोडतीमध्ये नवी मुंबईतील खांदेश्वर, जुईनगर, वाशी, नेरुळ, सानपाडा, मानसरोवर, खारघर व इतर रेल्वेस्थानकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हजारो घरांचा समावेश राहणार आहे. यामुळे नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
मात्र या आगामी सोडतीत अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार या संदर्भात अनेकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारणा होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अर्ज कसा करावा लागणार?
सिडकोच्या आगामी सोडतीत इच्छुक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. https://lottery.cidcoindia.com या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक नागरिकांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वेबसाईटवर रजिस्टर फॉर लॉटरी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर अर्जदाराला त्याचा वैयक्तिक तपशील भरायचा आहे. यानंतर मग या लॉटरी साठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. मग भरलेला अर्ज काळजीपूर्वक वाचून तो सबमिट करायचा आहे.
अर्जात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. अर्ज जर चुकीचा भरला गेला तर तो अर्ज बाद होण्याची शक्यता आहे म्हणून अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जदाराला नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
नोंदणी शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने ज्या उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केला आहे त्यासाठी आवश्यक असणारी अनामत रक्कम भरायची आहे. यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढणे आवश्यक आहे. पुढील कारवाईसाठी अर्जदाराने प्रिंट आऊट काढणे विसरू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार
सिडकोच्या लॉटरी साठी अर्ज करताना इच्छुक अर्जदारांना पॅन कार्ड, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, जन्म प्रमाणपत्र, अर्जदारांचे संपर्क तपशील, बँक तपशील हे आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत. यामुळे इच्छुक नागरिकांनी आत्तापासूनच हे कागदपत्रे जमवून ठेवावे आणि अनामत रक्कम देखील तयार ठेवावी असे आवाहन केले जात आहे.