Cidco Homes : गेल्या काही वर्षांपासून मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, नागपुर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे घर खरेदीचे स्वप्न पाहणारे हजारो नागरिक म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.
म्हाडा आणि सिडको प्राधिकरण राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देत असते. त्यासाठी प्राधिकरणाकडून लॉटरी जाहीर केली जाते. दरम्यान सिडको प्राधिकरण नवी मुंबई मधील हजारो घरांसाठी लवकरच लॉटरी जाहीर करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
सिडको प्राधिकरण 67 हजार घरांपैकी 26000 घरांसाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी लॉटरी जाहीर करणार अशी बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशी अर्थातच 11 ऑक्टोबरला ही लॉटरी जाहीर होणार आहे.
त्याकरिता सिडकोकडून घर खरेदीदाराकडून सर्वप्रथम नोंदणी अर्ज मागविले जाणार आहेत. नोंदणी झालेल्या अर्जदारांची आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतर पात्र अर्जदारांना प्राधान्यक्रम देऊन पसंतीच्या घरांची नोंदणी करता येणार आहे.
येत्या ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वाशी येथे महाराष्ट्र भवनच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडको घरांची सोडत काढण्याचा निश्चय सिडकोने घेतला असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली आहे.
या पार्श्वभूमीवर सिडकोचा मार्केटिंग विभाग व व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडको इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 26000 घरांसाठी लॉटरी करणार आहे. त्यामुळे या लॉटरी कडे साऱ्यांचे लक्ष आहे.
या लॉटरीमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या आगामी लॉटरीमध्ये सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना आपल्या पसंतीचे घर निवडण्यासाठी १५ घरांचे पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या पसंतीक्रमाला एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील.
त्या घरासाठी सोडत निघून विजेत्याला ते घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान या आगामी लॉटरी ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल आणि यामध्ये या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत, पैसे भरण्याची मुदत, पसंतीच्या घरासाठी पर्याय निवडण्याची व सोडतीची मुदत इत्यादी बाबतचे वेळापत्रक दिले जाणार आहे.
खरे तर सिडकोच्या या आगामी सोडतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र या लॉटरी ला अजून मुहूर्त लागत नाहीये. दरम्यान उद्या अर्थातच 11 ऑक्टोबरला या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.