Cidco Homes : मुंबई नजीक वेगाने विकसित होणाऱ्या नवी मुंबई शहरात आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेक जण पाहतात. मात्र नवी मुंबई शहरातील घरांच्या किमती गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या शहरात घर घेणे खूपच अवघड बनत आहे. अशा परिस्थितीत सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये विकसित होणाऱ्या घरांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.
सिडको प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करत असते आणि या घरांसाठी लॉटरी काढली जात असते. दरवर्षी सिडको प्राधिकरण नवी मुंबई मधील हजारो घरांसाठी लॉटरी काढते.
यंदाही प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात विकसित झालेल्या 26,667 घरांसाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर लॉटरी काढली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला ही लॉटरी 2 ऑक्टोबरला जाहीर होणार असे वृत्त समोर आले होते. मात्र नंतर ही तारीख 7 ऑक्टोबर करण्यात आली.
मात्र आता सात ऑक्टोबरला ही सिडकोची लॉटरी जाहीर होणार नाही असे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे सिडको प्राधिकरणाची ही हजारो घरांसाठीची लॉटरी नेमकी कधी निघणार हा प्रश्न इच्छुक अर्जदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
सिडकोच्या या आगामी लॉटरीमध्ये समाविष्ट असणारी घरे अगदीच मोक्याच्या ठिकाणी असून यातील बहुतांशी घरे रेल्वे स्थानकांनजीक असल्याने या घरांना नागरिकांच्या माध्यमातून उदंड प्रतिसाद मिळू शकतो अशी आशा आहे. त्यामुळे या आगामी सोडतीकडे हजारो नागरिकांचे लक्ष आहे.
मात्र आता ही सोडत नियोजित तारखेला जाहीर होणार नसल्याचे दिसते. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीतुन ही सोडत 7 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार अशी बातमी समोर आली होती. स्वतः सिडको प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी ही माहिती दिली होती.
पण या आगामी सोडतीमधील ऑनलाइन प्रक्रियेत घरांचा राखीव प्रवर्गाची वर्गवारी, त्याच बरोबर इतर काही तांत्रिक कामे अजून शिल्लक आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, असे असतानाही ही सोडत 8 ऑक्टोबर आधी घ्यावी अशा सुचना अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता लागण्या पूर्वी ही सोडत व्हावी अशा सुचना सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. तसेच 7 ऑक्टोबरला ही सोडत जाहीर होणार असे अध्यक्षांनी म्हटले होते. मात्र याचं आगामी सोडतीसंदर्भात काल एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सोडतीची अंतिम तयारी झालेली नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही नियोजित तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता सिडको प्राधिकरणाची ही आगामी सोडत नेमकी कधी जाहीर होणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.