Chilli Farming : मिरची हे एक प्रमुख भाजीपाला आणि मसाला पीक आहे. हिरवी आणि लाल मिरची दोघांना बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे भारतात हिरवी आणि लाल अशा दोन्ही प्रकारच्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
लाल मिरचीच्या उत्पादनाचा विचार केला असता देशातील विविध राज्यांमध्ये या मिरचीचे उत्पादन होते. आपल्या महाराष्ट्रात देखील लाल मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
राज्यातील खानदेश मधील नंदुरबार हा जिल्हा लाल मिरचीच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. शिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर मधील काही भागात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे.
या दोन्ही जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे लाल मिरचीच्या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान, राज्यसहित संपूर्ण भारतातील लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी लाल मिरचीच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. विशेष बाब अशी की, या नव्याने विकसित झालेल्या जाती मर रोगाला बळी पडत नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणार आहे तसेच त्यांच्या उत्पादन खर्चात देखील मोठी बचत होऊ शकणार आहे.
लाल मिरचीच्या नव्याने विकसित झालेल्या जाती कोणत्या
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय फळबाग संशोधन संस्था बेंगळुरू यांनी लाल मिरचीचे तीन हायब्रीड वाण तयार केले आहेत.
अर्का निहिरा, अर्का धृती आणि अर्का गगन या तीन नवीन जाती या संशोधन संस्थेने तयार केल्या आहेत. लाल मिरचीचे उत्पादन पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि मररोगामुळे मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.
मात्र या संशोधन संस्थेने विकसित केलेल्या या नवीन जाती रोगांना बळी पडत नाहीत. ही जात मर रोगाला बळी पडत नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे.
अजून मिरचीचे हे नवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले नाही मात्र लवकरच या तिन्ही जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.