Chemical Fertilizer Rate : राज्यासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत आणि या महत्त्वाच्या अवस्थेत पिकांना खतांची गरज भासणार आहे.
अशा परिस्थितीत रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असल्याने साहजिकच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. परिणामी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या सरकारच्या विरोधात नाराजीचे वातावरण तयार होत आहे.
एक जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या नव्या किमती लागू करण्यात आल्या आहेत. रासायनिक खतांच्या किमतीत देशात 200 ते 300 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. आधीच देशातील शेतकरी बांधव वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिंतेत आहेत, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने पिकासाठी आलेला खर्च भरून कसा काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
उत्पादन खर्च विविध कारणांमुळे वाढत चालला आहे. वाढती महागाई, मजुरीचे वाढलेले दर, बी बियाण्यांचे वाढलेले दर अन यातच आता खतांच्या किमती सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे उत्पादन खर्चात आणखी वाढ होणार आहे.
एकीकडे उत्पादन खर्च सतत वाढत आहे तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात प्रेशर पाहायला मिळतोय. शेतमालाला अपेक्षित दर मिळत नाहीये. म्हणून शेतीचा हा व्यवसाय नेमका करायचा कसा? असंच सुरु राहील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने कसे वाढणार? हा मोठा प्रश्न आहे.
खत उत्पादक कंपन्यांनी नव्या वर्षात विविध खतांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये युरियाचे दर फक्त स्थिर आहेत. युरियाच्या किमती स्थिर असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे पण इतर खतांच्या किमती वाढवून खत उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांचे बजेट बिघडवले आहे.
डीएपी, टीएसपी आणि मिश्र खतांच्या किमती नव्या वर्षात वाढवल्या गेल्या आहेत. आता आपण रासायनिक खतांच्या किमती नेमक्या कितीने वाढल्यात याबाबत माहिती पाहुयात. मिळालेल्या माहितीनुसार आधी डीएपी खत 1350 रुपयांना मिळतं होत, पण आता या खताची किंमत प्रति बॅग 1590 रुपये एवढी करण्यात आली आहे.
तसेच, टीएसपी 46 टक्के खताचा दर 1300 रुपयांवरून 1350 रुपयांवर गेला आहे. शिवाय, 10.26.26 आणि 12.32.16 या मिश्र खतांच्या किमती सुद्धा अनुक्रमे 1725 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.