Buffalo Farming : भारतात फार पूर्वीपासून शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय केला जातोय. गाय, म्हैस, शेळीपालन तसेच कुकूटपालना सारखे शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. हे शेतीपूरक व्यवसाय खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.
यातील म्हैस पालन हा व्यवसाय सर्वाधिक केला जात आहे. म्हैस पालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. म्हशींचे पालनपोषण करून शेतकरी बांधव चांगला नफा मिळवत आहेत.
शेतकऱ्यांसमवेत शेतमजूर कुटुंब देखील मोठ्या प्रमाणात म्हैस पालन व्यवसाय करते. मात्र या व्यवसायातून जर चांगली कमाई करायची असेल तर म्हशीच्या जातींची निवड करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
उच्च दूध उत्पादनक्षमता असणाऱ्या जातींची निवड केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना या व्यवसायातून चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, आज आपण म्हशीच्या अशाच एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
ही आहे सर्वाधिक दूध देणारी म्हैस
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात म्हशीच्या विविध जातींचे संगोपन केले जाते. म्हशीच्या कित्येक प्रजाती आहेत ज्या की उच्च दूध उत्पादनासाठी ओळखल्या जातात. मात्र भारतात सर्वाधिक दूध देणारी म्हशीची जात मुर्राह आहे.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे भारतातील कोणत्याही राज्यात याचे संगोपन केले जाऊ शकते. म्हणजेच कोणत्याही हवामानात या जातीची म्हैस पाळली जाऊ शकते. या जातीच्या म्हशींचे संगोपन करून दूध विकून चांगला नफा मिळवता येतो.
याशिवाय गोदावरी, तराई आणि भदावरी जातीच्या म्हशींचे संगोपन करूनही चांगला नफा मिळवता येणार आहे. या प्रजातीची म्हैस स्थानिक आणि इतर प्रजातींच्या म्हशींच्या दुप्पट दूध देते. ही म्हैस दररोज सरासरी 15 ते 20 लिटर दूध देते.
विशेष बाब म्हणजे या जातीच्या म्हशीची योग्य काळजी घेतली त्यांना चांगला आहार दिला तर दूध उत्पादन वाढते. काही शेतकरी बांधव या जातीच्या म्हशी पासून 30-35 लिटर दूध उत्पादन मिळवत आहेत.
मात्र यासाठी म्हशीचा खुराक, आरोग्य, निवारा इत्यादी गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे बाजारात या जातीच्या म्हशीला चांगला भाव मिळतो.